मुंबई : कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soyabean) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज मुंबईच्या (Mumbai)  दिशेने निघणार आहेत. सोमाठणा या गावात सध्या तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. रविकांत तुपकर आज बुलढाणा आणि नंतर शेकडो वाहनं आणि हजारो शेतकऱ्यांसह मुंबईकडे निघणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालय (Mantralaya)  ताब्यात घेण्याच्या इशाऱ्याचा पार्श्वमीवर पोलिसांनीही मोठा बंदोबस्त सोमाठणा गावापासून बुलढाण्यापर्यंत ठेवला आहे. दरम्यान,  सरकारने बळाचा वापर केल्यास रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. तसंच काहीही करुन मंत्रालय ताब्यात घेणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान झालं आहे. पाऊस नाही तरी सरकार दुष्काळ (Drought) जाहीर करत नाही. त्यामुळं सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करुन कापसाला 12 हजार आणि सोयाबीनला 10 हजार रुपयांचा भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे. तसेच जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं असे ते म्हणाले.  मुंबईला मुक्कामी जाणार आहे, रोख सको तो रोख लो असा इशारा तुपकरांनी दिला आहे. 


सरकारने बळाचा वापर केला तर रक्तपात होईल: तुपकर


 तुपकर म्हणाले,  आम्ही आज मुंबईकडे निघणार आहे. सरकारने बळाचा वापर केला तर रक्तपात होईल. आम्हला थांबविण्याचा प्रयत्न केल्यास शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा करत आमच्या चार टीम आधीच मुंबईत दाखल झाल्या आहेत. काहीही करून मंत्रालय ताब्यात घेणार आहे. काही सत्ताधारी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकरांनी मांडली.


सामान्य शेतकऱ्याला जर त्रास दिला तर याद राखा


आम्ही मरायला तयार आहोत तर मारायला ही तयार आहोत. सामान्य शेतकऱ्याला जर त्रास दिला तर याद राखा असा इशार रविकांत तुपकरांनी दिला आहे. सरकारने आमचं आंदोलन गंभीरतेनं घ्यावं. जर का सामन्यांच्या हातात आंदोलन गेलं सरकारला महागात पडेल असे तुपकर म्हणाले. आज रात्री शेतकऱ्यांशी चर्चा करुन उद्याची भूमिका ठरवू. आम्ही मर्दाची औलाद आहोत, आम्ही सांगून आंदोलन करू असे तुपकर म्हणाले. आम्ही मुंबईत जाऊच असे तुपकर म्हणाले. मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. पण त्यांना आमदार खासदार विकत मिळतात असे तुपकर म्हणाले.  


काय आहेत मागण्या?


सोयाबीन,कापूस,इतर पिकांच्या नुकसानीपोटी एकरी दहा हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी.सोयाबीनला प्रती क्विंटल नऊ हजार,कापसाला प्रती क्विंटल किमान 12 हजार 500 रुपये भाव द्यावा.तसेच पीक विम्याची अग्रिम आणि शंभर टक्के पीक विमा भरपाई  मिळावी यासह अनेक मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.सरकारने कापसाला व सोयाबीनला एक आठावड्यात योग्य हमी भाव दिला पाहिजे.