Maharashtra Buldhana News: विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांत गुरांवरील लम्पी आजार (Lumpy Skin Disease) वाढला असला तरी मात्र प्रशासनानं अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्यामुळेच सध्या तरी विदर्भात परिस्थिती नियंत्रणात असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र अनेक जिल्ह्यात प्रशासनानं कडक पावलं उचलत या आजाराला सध्या तरी नियंत्रणात ठेवलं आहे.
बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांवर लम्पी चर्मरोगाचा संसर्ग वाढला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 19 जनावरांना लम्पीचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी आठ जनावरं बरी झाली आहेत, तर 11 जनावरांवर अद्याप उपचार सुरू आहेत. तर एका जनावराचा लम्पीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्वाधिक बाधित जनावरं हे देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर, लोणार, नांदुरामध्ये आढळून आली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 4 लाख 91 हजार जनावरांपैकी 92 टक्के जनावरांचं लसीकरण पूर्ण झालं असून उर्वरित लसीकरण येत्या तीन दिवसांत पूर्ण केलं जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.
एकंदरीत संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर लम्पीचा प्रादुर्भाव पश्चिम विदर्भात सध्या वाढत असल्याच चित्र आहे, मात्र अनेक जिल्ह्यात प्रशासनानं अनेक उपाययोजना केल्यानं सध्या विदर्भात परिस्थिती नियंत्रणात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसत आहे. त्यात लम्पी सारख्या आजारानं डोकं वर काढलंय, यामुळे शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे.
लम्पी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात किती अन् काय उपाययोजना करण्यात आल्यात? पाहुयात सविस्तर...
- बुलढाणा : जिल्ह्यात 19 गुराना लम्पीची लागण, प्रशासनानं गुरांचे बाजार बंद केले, तर 92 टक्के गुरांचं लसीकरण पूर्ण.
- वाशिम : जिल्ह्यात 07 गुरांना लम्पीची लागण, पशू संवर्धन विभागाकडून अनेक उपाययोजनांसह गुरांचं 93 टक्के लसीकरण करण्यात आलं असून जिल्ह्यात गुरांचे बाजार बंद.
- नागपूर : जिल्ह्यात सध्यस्थितीत लम्पीची लागण दिसत नसली, तरी प्रशासनानं मात्र अनेक उपाययोजना करत गुरांच्या वाहतुकीवर बंदी लावली आहे.
- गोंदिया : जिल्ह्यात लम्पीची अद्याप लागण झानी नसली तरी सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
- भंडारा : जिल्ह्यात सध्यातरी लम्पीची लागण नाही, उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, यंदा पाऊस कमी असल्यानं संपूर्ण राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसत आहे. त्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पीचा शिरकाव झाल्यामुळे मात्र शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनचा वाढता धोका, कशी घ्याल जनावरांची काळजी? वाचा सविस्तर