बुलढाणा : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून विदर्भ आणि मराठवाड्यात चटके देणारं ऊन पडलंय. सोलापूर जिल्ह्याने 42 अंश सेल्सियसचा आकडा गाठला असता विदर्भातही तापमानाने चाळीसी केव्हाच पार केली आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील नागरिकांना फटका बसत असून कडक उन्हाचा (Summer) त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, येथील शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. अकोला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांना संस्कार सोनटक्के याच्या मृत्यूबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर, आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र, 12 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघातामुळे झाला नसल्याचे आता समोर आले आहे.
शेगावातील त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. अकोला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलंय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू हा उष्माघाताने नसून विषाणूजन्य मेंदू ज्वराने झाला असल्याचं स्पष्टीकरण अकोला महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. आशिष गिऱ्हे यांनी दिले आहे.
उन्हात बाहेर जाणे टाळा, भरपूर पाणी प्या
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 12 वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन केलं आहे . शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावं , तसंच उष्माघाताची लक्षणे व आढळल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जनतेला केले. दरम्यान, संस्कार सोनटक्के याचा मृत्यू उष्माघाताने झाला नसल्याचेही आता स्पष्ट झालं आहे.
नंदूरबारमध्ये पारा 43 अंश सेल्सियसवर
विदर्भात कडक उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नंदुरबार जिल्ह्यात उष्माघाताची लाट पसरली आहे. येथे तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी 40°c वर असलेला तापमान आज 43 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातच उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याने ते घराबाहेर पडताना देखील विचार करत आहेत. सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी घरातच बसणे किंवा सकाळी लवकर, सायंकाळी ऊन उतरल्यानंतर घराबाहेर पडणे पसंत करत आहेत.
हेही वाचा
5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक