बुलढाणा:  बुलढाणा (Buldhana News) जिल्हा सामान्य रुग्णालय व रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सध्या एका भलत्याच समस्येने ग्रासले आहेत. इंग्रजांच्या काळातील हे रुग्णालय राज्यातील एक नावाजलेले रुग्णालय आहे ,मात्र जिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक नसल्याने रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालय परिसरात शेकडो वराह अर्थात डुकरांचा मुक्त संचार बघायला मिळत असून अनेकदा रुग्णांच्या वॉर्ड मध्ये सुद्धा हे प्राणी जाऊन परिसर अस्वच्छ करतात तर रुग्णांच्या नातेवाईकांना व रूग्णांना डुकराच्या सहवासात उपचार घेण्याची वेळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हल्ली बघायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या समस्येने  ग्रासले आहेत.


रुग्णालयात असतात जिल्हाभरातून रुग्ण..


बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाचा दर्जा खालावत असल्याने येथील सोयी सुविधांचा अभाव असल्याने मात्र जिल्हाभरातील ग्रामीण व गरीब रुग्णांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे , रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वछतेचा त्रास रुग्णांना व नातेवाईकांना सहन करावा लागत आहे.


जिल्हा प्रशासनासह शल्य चिकित्सकांच ही दुर्लक्ष


रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरीब रुग्णाला सोयी सुविधेसह चांगल्या दर्जाचे उपचार मिळणं अपेक्षित असताना मात्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा प्रशासना सह जिल्हा शल्य चिकित्सक यांचही दुलक्ष असल्याने मात्र गरीब जनता डूकरांच्या सानिध्यात राहून उपचार घेत आहेत. अनेकदा वृद्ध रुग्णावर किंवा रुग्णाच्या नातेवाइकांवर डुकरानी हल्ला केल्याच्याही घटना रुग्णालय परिसरात घडल्या मात्र याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाहीत.


रुग्णांना व नातेवाईकांना स्वाईन फ्ल्यूचा धोका...


जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सर्रास फिरणाऱ्या मोकाट डुकरं , श्वान , गाई यामुळे मात्र रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना या मोकाट जनावरांपासून आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकदा तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातातील अन्न ही जनावर हल्ला करून पळवून नेत असल्याची माहिती आहे.