बुलढाणा : बुलढाण्याच्या (Buldhana News)  अमडापुर येथील एका विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमडापुर येथील एका महिलेवर ती घरी एकटी असताना शाम जुमडे व प्रताप कौसे या दोघांनी तिला घरात बांधून तिच्यावर 30 मे 2017 रोजी अत्याचार केले होते. यात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या प्रकरणी काल बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत दोन्ही आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 


पीडितेने बदलवला होता जवाब...


या खटल्यात विशेष म्हणजे पिडीतेने घडलेली घटना न्यायालयासमोर सांगितली. मात्र नंतर उलट तपासणीत आपला जबाब बदलवून घटना घडली नसल्याचं सांगितलं. मात्र न्यायालयाने पीडितेच्या भावाचा व काकांचा जबाब ग्राह्य धरत हे प्रकरण बाहेर आपसात मिटविल्याची कबुली दिली होती. मात्र न्यायालयाने डॉक्टर व तपास अधिकारी व पीडितेने सुरुवातीला दिलेला 164 सीआरपीसीनुसार दिलेला जवाब ग्राह्य धरत न्यायालयाने दोघा आरोपींना आजन्म करावसाची शिक्षा सुनावली आहे.


नेमकी घटना काय होती...!


अमडापूर येथील एका 23 वर्षीय पिढीतेवर गावातील श्याम जुमडे व प्रताप कौसे या दोघांनी एकत्र येऊन पिढीतेवर अत्याचार करण्याचे ठरवून त्यानुसार त्यांनी 30 मे 2017 रोजी पीडिता ही दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरी एकटी असताना आरोपी प्रताप कौसे हा तिच्या घरी आला व तुला शाम जुमडेने बोलावलं असे म्हटलं, तेव्हा पीडीतेने नकार दिला. परंतु दुपारी दीड वाजेच्या सुमारास पीडीता ही तिच्या आईच्या मामाकडे जात असताना प्रताप कैसे याने तिचा पाठलाग केला व तिला रस्त्यात असलेल्या देवेंद्र इंगळे यांच्या घरामध्ये तोंड दाबून ओढत नेलं .यावेळी त्या घरामध्ये श्याम जुमडे एकटाच होता. आरोपी प्रताप कौसे याने पिडितेला घरात लोटत घराची कडी बाहेरून बंद केली. एवढ्यावरच तो न थांबता त्यावेळेस श्याम जुमडे व प्रताप कैसे यांनी पीडितेला  हातपाय पलंगाला बांधून श्याम जुमडे याने पीडितेवर दुपारी अत्याचार केला आणि दोघेही तिथून निघून गेले तेवढ्यावरच न थांबता श्याम याने दुपारी साडेचार वाजेपर्यंत घरात पुन्हा पीडीतेवर येऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक भाऊ व काका यांनी पीडितेची सुटका केली. अशी तक्रार पीडितेने 30 मे 2017 रोजी अमरापूर पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम  341, 442, 366, 376 ड व 34 नुसार गुन्हा नोंदवला दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं.


सरकारी अभियोक्ता यांचा प्रभावी युक्तिवाद


या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. पी. हिवाळे यांनी पीडित व इतर साक्षीदारानी सरकारी पक्षाला सहकार्य केले नाही तरीसुद्धा सक्षमपणे व प्रभावीपणे युक्तिवाद करून सरकार पक्षाची कायदेशीर बाजू मांडली व विद्यमान न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणात तपास अधिकारी उमेश भोसले यांनी सुद्धा महत्त्वाचा तपास केला.


आरोपींना नेमकी किती शिक्षा..?


पिडीतेने घडलेली घटना न्यायालयासमोर सांगितली व नंतर उलट तपासणी मध्ये घटना घडली नसल्याचे सांगितलं .तरी सरकार पक्षाने तिचे काका व भाऊ यांचा न्यायालयात पुरावा नोंदविला व दोघांनी कोर्टा बाहेर आपसात प्रकरण मिटवल्याचं कबूल केलं. प्रत्यक्ष घटना खरी सांगितली नाही .परंतु डॉक्टर व तपास अधिकारी तसेच पीडितेचा कोर्टासमोर 144  सीआरपीसी नुसार घेतलेला जबाब व पिडीतेने सुरुवातीला सांगितलेली घटना या आधारे न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरून आरोपी शाम जुमडे व प्रताप कौसे या दोघांना कलम 341, 34 नुसार एक महिना सक्त मजुरी व प्रत्येकी पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली तर भादवीचे कलम 342, 34 नुसार दोघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड तर कलम 366 व 34 अन्वये दोन्ही आरोपींना प्रत्येकी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड तर कलम 376 ड नुसार मुख्य आरोपी  व त्याला मदत करणारा प्रताप कौसे या दोघांना जन्मठेप म्हणजेच मरेपर्यंत कारावास व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.