बुलढाणा : कोणत्या एसपी साहेबांचं ऐकावे आणि आता काय करावे? हा मोठा पेच प्रसंग जिल्हा पोलीस (Police) प्रशासनातील पोलीस अधिकाऱ्यांसमोर येऊन पडला आहे. त्याचं कारणही तसच आहे. आपल्या बदलीला (Transfer) स्थगिती मिळालेले एसपी विश्व पानसरे आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या केबिनमध्ये येऊन बसले आणि त्यांनी कार्यालयातील खुर्चीचा ताबा घेतला. विशेष म्हणजे त्याच खुर्चीवर बसून नवीन एसपी निलेश तांबे यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर निलेश तांबे आज सकाळी परेडसाठी पण दाखल झाले होते. इकडे मात्र सकाळीच एस पी विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश करून सगळ्यांना धक्का दिला. त्यामुळे, एक फूल दोन माली, किंवा एक खुर्ची दोन IPS साहेब अशी चर्चा बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात रंगली आहे.   

Continues below advertisement

आयपीएस अधिकारी विश्वास पानसरे मागील चार ते पाच दिवसांपासून आजारीपणामुळे रजेवर होते. गृह विभागाने त्यांची बदली अमरावती या ठिकाणी करून त्यांच्या जागी तांबे यांची वर्णी लावली होती. परंतु, आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत एसपी पानसरे यांनी कॅटमध्ये प्रकरण दाखल केले होते. कॅटने पानसरे यांच्या बाजुने निकाल दिल्यामुळे काही तासातच त्यांच्या बदलीला स्थगिती देखील मिळाली. त्यामुळे, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कोण कार्यभार सांभाळणार अशी चर्चा तेव्हापासून जिल्ह्यात सुरू झाली आहे. कारण, दुसरीकडे बदली होऊन इकडे आलेल्या निलेश तांबे यांनी रातोरात बुलढाणा गाठून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी मागील तीन ते चार दिवसांपासून कार्यभार स्वीकारत कामकाजहीसुरू केलेलं आहे. त्यामुळे, पोलीस वर्तुळात आणि राजकीय नेते, सर्वसामान्यांना प्रश्न पडला की, बुलढाणा जिल्ह्याचे एसपी नेमके कोण? हा प्रश्न जसा पोलीस प्रशासनाला पडलाय तसाच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा पडला आहे.

मी पदभार घेतलाय, त्यांनाच विचारा - पानसरे

दरम्यान, याबाबत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी मी आज पोलीस अधीक्षकपदाचा पुन्हा पदभार घेतला असून मी रुजू झाल्याचे त्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याबद्दल विचारलं असता ते त्यांनाच माहिती मला त्याबद्दल माहिती नाही, असं उत्तर पानसरे यांनी दिलंय. त्यामुळे, एकंदरीत सध्या बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत असून पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

मोठी बातमी : जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले, थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार, थोरले पवार भाकरी फिरवणार?