बुलढाणा: बुलढाण्याच्या प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घटमांडणीचे (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2022) भाकित 2022 मध्येही जाहीर करण्यात आले होते. 370 वर्षांची परंपरा असलेली आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेली प्रथा म्हणजे 'भेंडवळची घटमांडणी'. या घटमांडणीत करण्यात आलेली भाकिते आणि त्यानंतरची प्रत्यक्ष स्थिती सविस्तर पाहूया... 


पावसाविषयी सांगितलेले अंदाज व प्रत्यक्ष स्थिती



  • जून महिन्यात साधारण पाऊस सांगण्यात आला होता, मात्र जून 2022 या महिन्यात सरासरी 155 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे भेंडवळच्या भाकितात वर्तवण्यात आल्यापेक्षा कमी पाऊस मागील वर्षी पडला.

  • भाकितानुसार, जुलै महिन्यात सर्वात कमी पाऊस सांगितला होता. परंतु जुलै महिन्यात सरासरी 394 मिलिमीटर पाऊस झाला, त्यामुळे प्रत्यक्ष सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यातच झाला.

  • ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस सांगितला गेला होता, परंतु याही महिन्यात सरासरी 168 मिलिमीटर पाऊस पडला, म्हणजेच भरपूर पाऊस पडला.

  • सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस सांगितला होता, त्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात साधारणत: 303 मिलिमीटर पाऊस पडल्याने हा अंदाज साधारणत: थोडाफार मिळताजुळता राहिला.


देशाविषयी इतर भाकिते



  • घटमांडणी परंपरेतील भाकितानुसार राजा (सत्ताधारी) कायम राहील असे सांगण्यात आले होते, मात्र जून महिन्यात झालेल्या सत्तांतरात मुख्यमंत्री पायउतार झाले आणि सरकार बदलले.

  • घटमांडणीतील कुरडई आणि पापड गायब असल्याने चारा टंचाई असल्याचे भाकीत करण्यात आले होते, प्रत्यक्षात मात्र 2022 या वर्षात चारा टंचाई कुठेही जाणवली नाही.

  • घटमांडणीतील घटावरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर संकट येतील. भूकंप, अतिवृष्टी, त्सुनामी अशा आपत्ती येतील असे सांगण्यात आले होते. तसे पाहता काही ठिकाणी हे लागू होते. परंतु मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर कुठेही संकट आलेले नाही.

  • देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत राहील असेही गेल्या वर्षीच्या भाकितात सांगण्यात आले होते.

  • शत्रूच्या कुरघोड्या सुरूच राहतील असेही मागील वर्षाच्या भाकितात सांगण्यात आले होते.


पिकांविषयी भाकिते



  • कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रभाव राहील असे गेल्यावर्षी सांगण्यात आले होते, परंतु यावर्षी कापसावर बोंड अळी क्वचितच दिसून आली.

  • घटमांडणीतील भाकितात तुरीचे पीक सर्वाधिक येईल असेही सांगण्यात आले होते, मात्र 2022 मध्ये तुरीचे पीक साधारण आलेले आहे.

  • अवकाळी पावसाचे संकट कायम राहील असेही सांगण्यात आले होते, वर्तवलेल्या भाकितानुसार यावर्षी अवकाळी पाऊस प्रत्येक महिन्यात बरसत आहे.

  • गव्हाचे पिकही उत्तम राहील असेही सांगण्यात आले होते, त्यानुसार यावर्षी गव्हाचे पीक खरोखरच उत्तम आहे.


संबंधित बातम्या: