पालघर : तारापूर औद्यागिक वसाहतीमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात कंपनी मालक गंभीर जखमी असून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम झोन मधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सात कामगारांचा मृत्यू झाला असून जवळपास आठ कामगार इमारती खाली गाडले गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक महिला तसंच एका मुलीचा समावेश असून जखमी असलेल्या कामगारांवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल,  रुग्णवाहिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह पालघरचे पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं.


मिळालेली माहिती अशी की, तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 प्लॉटमध्ये तारा नाइट्रेट या खासगी कंपनीत शनिवारी सात वाजताच्या आसपास भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीची इमारतीचा काही भाग कोसळून पडला असून यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसतानाच कंपनीत उत्पादन घेण्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.


घटनेतील मृतकांची आणि जखमींची नावं


मृतक - इलियाज अंसारी (40), निशु राहुल सिंह (26), माधुरी वशिष्ठ सिंह (46), गोलू सुरेंद्र यादव(19), राजमती देवी सुरेंद्र यादव (40) , मोहन इंगळे (52)


जखमी - मुलायम जगत बहादुर यादव (23), राकेश कुमार, चेतराम जायसवाल (50), सचिन कुमार, रामबाबू यादव (18) रोहित वशिष्ठ सिंह (19), नटवरलाल बी.पटेल (56, प्राची राहुल सिंह (6) ऋतिका राहुल सिंह (3)


स्फोटाने हादरला परिसर


कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीची इमारत कोसळली आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. यामध्ये बाजूच्या इतर कंपन्यांना याची झळ पोहोचली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत कंपनीचे मालक नटुभाई पटेल हे देखील होत. ते देखील यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


घटनास्थळी फायरब्रिगेडच्या पाच ते सात गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच 9 ते 10 रुग्णवाहिकाही दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्फोटाचे कारण मात्र अजूनही समोर आले नाही.


मृतकांचा आकडा वाढण्याची भीती


कंपनीत नायट्रोजन प्रोसेस सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या बाबत अधिकारी काही बोलण्यास तूर्तास तयार नाहीत. यामध्ये 7 गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून काहींना मुंबईला पाठविण्यात येत आहे. मात्र त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सदर कंपनी दोन दिवसांपूर्वी चालू करण्यात आली होती. कंपनीचे सिव्हीलचे काम चालू होते. स्फोटात मृत पावलेल्या कामगारांमध्ये एका महिला कामगाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अपघातात एक सहा वर्षाचा मुलगा त्यांच्यासोबत होता, त्याला कुठलीही इजा झाली नाही.


मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत : मुख्यमंत्री 


तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.