Beed News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही यात्रा मंगळवारी माजलगावात आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर शहरातील मुख्य रस्त्यावर व राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना लावण्यात आले होते. यातीलच धरणाच्या कमानीजवळ लावलेले एक बॅनर काढताना वीज वाहक तारेला बॅनरचा स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौतम सरपते राहणार केसापुरी असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रात्री घडली.
परवानगी न घेतला लावले होते बॅनर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वागताचे बॅनर सिंदफणा नदी पात्र ते केसापुरी कॅम्पपर्यंत लावले होते. 5 किमीपर्यंत लावण्यात आलेल्या बॅनरमुळे शहरातून चालणे मुश्किल झाले होते. या लावण्यात आलेल्या बॅनरला माजलगाव नगरपालिका व राष्ट्रीय महामार्गाकडून कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नव्हती. दरम्यान, बाजार समितीचे सभापती यांनी धरणाच्या कमानीजवळ त्यांचे स्वतःचे बॅनर लावले होते. हे बॅनर देखील विनापरवानगी लावण्यात आले होते. काल रात्री 11 वाजता हे बॅनर काढत असताना बॅनरचा स्पर्श वीज वाहक तारेस झाल्याने विजेचा धक्का बसून गौतम हरपते या 25 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या: