बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) याच्यासह 6 जण बीज जिल्हा कारागृहात आहेत. सध्या याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने सध्या जिल्हा कारागृहात आहेत. मात्र, आज सकाळी वाल्मिक कराड आणि बबन गिते गँगमधील महादेव गिते यांच्यात मारहाण झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली होती. या कारागृहाचे अधीक्षक मुस्लिम असल्याने ते रमजान ईदनिमित्ताने ते आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे, कारागृहात मारहाणीची घटना घडली. त्यामध्ये, वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता बीड (Beed) जिल्हा कारागृह प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली.
बीड जिल्हा कारागृहातील पत्रकानुसार, आज 31 मार्च 2025 रोजी रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदिप रावसाहेब सोनवणे व न्यायाधीन बंदी राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपआपले सर्कल समोर सकाळी 9.15 ते 9.30 च्या सुमारास त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना दुरध्वनी करण्यासाठी आले होते. त्यावेळी, एकेमेकांकडे पाहुन त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली. त्यावेळीच कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटापटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले व गोंधळ व शिवीगाळ करू लागले. त्यावेळी, कर्तव्यावरील कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळे केले व बंद्यांना आपआपले यार्डमधील बरॅकमध्ये बंदीस्त करण्यात आले आहे. सदर घटनेमधील बंद्यावर कायदेशीर कारवाई करणेकरीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करीत आहोत. सध्यस्थितीत कारागृहात शांतता आहे, अशी माहिती बीड जिल्हा कारागृह अधीक्षक बी.एन. मुलाणी यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
वाल्मिक कराडला मारहाण झाली नाही -
दरम्यान, न्यायाधीन बंदी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी बंदी सुदर्शन घले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती प्रसार माध्यमांवर सुरु आहे. परंतू प्रत्यक्षात बंदी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही, असेही अधीक्षक मुलाणी यांनी पत्रकात म्हटले आहे.
आम्हालाच मारहाण - गित्ते
वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण झाली आहे, आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेने केला. कारागृहातील सीसीटीव्ही तपासा, यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गित्ते याने सांगितले.
हेही वाचा
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?