Walmik Karad Surrender: बीड जिल्ह्यातील मस्साजोगगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (walmik Karad) यानी अखेर सीआयडी पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केलं. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होत होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून फरार होते. पोलीस आणि सीआयडी त्याच्या मागावर होती. आज त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटूबांने संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 


वाल्मिक कराडने स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले आहे. माहिती नाही त्यांच्या मागे कोणाचा हात आहे. त्याचीही माहिती नाही, या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत म्हणतात, त्यांना कधी पकडणार असा सवाल करत आम्हाला न्याय कधी मिळणार असं संतोष देशमुख यांच्या बहिनीने म्हटलं आहे.


एका चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही, ही आज परिस्थिती आहे. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाल्याने आम्हाला आणि माझ्या भावाला न्याय मिळाल्याचं समाधान तरी मिळेल. लवकरात लवकर त्या तीन आरोपींना देखील अटक केली पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. यंत्रणांवरती आमचा विश्वास नाही अशी परिस्थिती आहे, इतकी मोठी यंत्रणा जर तपास करत असेल, तर मग आतापर्यंत का शोध लागत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी उपस्थित केला आहे.


वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं?


वाल्मीक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपूर्वी चर्चा
सकाळी 7 वाजता: पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते आले एकत्रित
सकाळी 9 वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त
सकाळी 10 वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि  गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल
सकाळी 11 वाजता: 12 ते 1 दरम्यान वाल्मीक कराड सी आय डी  कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर
दुपारी 12 वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मीक कराड याने व्हिडिओ केला शेयर
दुपारी 12.15 वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल 
दुपारी 1 वाजता: सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराडची चौकशी सुरु