बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्याला सीआयडीच्या 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी दबाव असतानाच तो सीआयडीला शरण आला आहे. त्यानंतर त्याची तब्येत काहीशी खालावल्याचं दिसून आलं.


नेमकं काय घडलं?


बीड मधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची काल रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही, दरम्यान कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे. 


काल रात्री सीआयडीने वाल्मीक कराडला अटक केल्यानंतर त्याला कोठडी मिळाल्यानंतर बीड मधील जेलमध्ये ठेवण्यात आलं. वाल्मिक कराडला रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा त्याने पोलिसांनी सांगितलं, त्यानंतर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी देखील केल्याची माहिती समोर आली आहे, आत्ता गेल्या दोन तासांपासून सीआयडी चौकशी करते आहे, कस्टडीतील पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडला श्वास घ्यायला त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती, डॉक्टरांचे एका पथकाने त्याची तपासणी देखील केली आहे, याची माहिती समोर आली आहे.


अखेर वाल्मिक कराड शरण!


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड काल पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. 


बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटले. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि कुटूंबाने आंदोलने केली. या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.