बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि बीड कारागृहात रवानगी करण्यात आली. केजमधील सीसीटीव्ही एसआयटीच्या हाती लागलं असून त्यामध्ये वाल्मिक कराडसह इतर सर्वच आरोपी एकत्रित दिसतात. त्यामध्ये निलंबित पीएसआय राजेश पाटीलही दिसतोय. या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून करण्यात येणार आहे.
वाल्मीक कराडचं कारागृहात काय होणार?
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर सर्वात आधी वैद्यकीय चाचणी झाली. त्यानंतर कारागृहाच्या गेटवर त्याची कैदी म्हणून नोंदणी झाली. याचवेळी त्याचं डिजिटल (ऑनलाइन) ऍडमिशन देखील करण्यात आलं.
कारागृहात येणाऱ्या नवीन कैद्यांसाठी तयार केलेल्या बराकमध्ये आज वाल्मिक कराडचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, गुन्ह्यानुसार वाल्मिकला कोणत्या बराकमध्ये ठेवायचं हे ठरवले जाईल. कारागृहात त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला जाईल. कारागृहात त्याचा कोणी विरोधक आहे का किंवा त्याला कुणापासून धोका आहे का याची खात्री केली जाईल.
कॅन्टिनचा वापर करता येणार
त्यानंतर नियमितपणे सकाळचा नाष्टा कराडला दिला जाईल. पुढे दुपारचं जेवण, चार वाजता चहा आणि रात्रीचं जेवण देखील दिलं जाईल. कारागृहात मिळणाऱ्या इतर खाद्य सुविधा मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला कॅन्टिनचा वापर करता येईल. त्यासाठी कराडला पैसे मोजावे लागतील.
वकिलाची आणि नातेवाईकांची भेट
वाल्मिक कराडला आठवड्यातून एकदा वकिलाची आणि एकदा नातेवाईकांची भेट घेता येईल. तसेच महिन्यातून तीन वेळा त्याला प्रत्येकी 10 मिनिटे अलन (हे फोनच नाव आहे) फोनवरून संभाषण करता येईल. यासाठी कारागृह प्रशासनाकडे तीन नंबर द्यावे लागतील. पण दिलेले नंबर त्याच्याच नातेवाईकांचे आहेत का याची खात्री कारागृह प्रशासनाकडून करण्यात येईल. त्यात या तिन्ही नंबरचे पोलिस व्हेरिफिकेशन होईल.
त्याला देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डवर या तीन फोन नंबरची नोंद केली जाईल. ते स्मार्ट कार्ड फोनच्या बॉक्सला लावल्यावर तीन नंबर अॅक्टिव्ह होतात. त्यापैकी एका नंबरवर कराडला बोलता येईल. विशेष म्हणजे दहा मिनिटं झाल्यानंतर हा फोन आपोआप बंद होईल.
वाल्मिक कराड गँगचे सीसीटीव्ही व्हायरल
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, तुरुंगात असलेला आरोपी विष्णू चाटे याच्या केज कार्यालयाबाहेरील कराड गँगचं सीसीटीव्ही माध्यमांच्या हाती लागलं होतं. यामध्ये वाल्मिक कराडसह सरपंच हत्येतले सर्वच आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. शिवाय त्यामध्ये निलंबित पीएसआय राजेश पाटीलही दिसला. हे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर हत्येच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीला जाग आली. त्यांनी हे फुटेज तपासासाठी ताब्यात घेतलं आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे एसआयटी कराडसह सर्वांची चौकशी करणार आहे. पण 1 जानेवारी रोजी स्थापन केलेल्या एसआयटीला, हे सीसीटीव्ही आधी का मिळालं नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ही बातमी वाचा: