Vijaysingh Pandit vs Yogesh Kshirsagar: बीड नगरपालिका निवडणुकीत योगेश क्षीरसागर विरुद्ध आमदार विजयसिंह पंडित संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून भाजपा नेते योगेश क्षीरसागर यांच्यावर जहरी टीका केली. कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही पळकुटेपणा केला. ही माझी निवडणूक नाही. मात्र, माझी निवडणूक ज्यावेळी येईल त्यावेळी तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही, अशा चिल्या पिल्याने माझ्यावर आरोप करू नये, असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला.
दुसऱ्यांचे वासे मोजण्याचा प्रयत्न करण्याचे तुमचे वय नाही
विजयसिंह पंडित म्हणाले की, बारामतीला जेवढे पैसे दिले नाही तेवढा निधी बीड नगरपालिकेला दिला असं पवार कुटुंब नेहमी सांगतं. मात्र, तो निधी गेला कुठे? हे तुम्ही सांगा. मागे काय दिवे लावले ते लोकांना सांगा असं थेट आव्हान जाहीर सभेतून पंडित यांनी क्षीरसागर यांना दिलं. नियतीने तुमची काय अवस्था केली ते आधी पहा. नियतीचा खेळ असतो. दुसऱ्यांचे वासे मोजण्याचा प्रयत्न करण्याचे तुमचे वय नाही. मुद्द्याची निवडणूक गुद्द्याकडे नेऊ नका. लोकशाहीच्या या उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर याद राखा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित अनंतराव पवार आहेत, असा इशारा पंडित यांनी क्षीरसागर यांना दिला.
अनेक दशके एकाच कुटुंबाकडे बीड नगरपालिका
त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत ज्याला पक्षाने संधी दिली होती, त्याने एकही निवडणूक लढवली नव्हती. नऊ वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत तीन प्रभागातून त्यांनी नामांकन दाखल केले आणि तीनही ठिकाणाहून त्यांचा अर्ज उडाला. अशा उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, कार्यकर्त्यांची निवडणूक आली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला. मी 25 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करत आलो आहे. घराचं नाव घेऊन पुढे आलो नाही, माझी ओळख घेऊन इथं आलो आहे. गेली अनेक दशके एकाच कुटुंबाकडे बीड नगरपालिका होती. अजितदादांनी या नगरपालिकेचे पालकत्व स्वीकारले असून या शहराला दत्तक घेण्याचे ठरवलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या