बीड : बीडमधील भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेचं पाडलेलं घर अज्ञातांनी पेटवून (Satish Bhosale House Fire) दिल्याची घटना काल (गुरूवारी) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या आगीच्या घटनेमध्ये त्याच्या घरातील काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत, या घटनेमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेचं घराचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी आग विझवली. त्यानंतर वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोझरने पाडलं होतं. त्यानंतर रात्रीच्या वेळी हे पाडलेलं घर पेटवण्यात आलं आहे. या आगीत जनावरांचा चारा पेटला काही पशूंचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. खोक्याचा फोन जप्त करण्यात आला आहे. त्यावरून फरार असताना तो कोणाच्या संपर्कात होता हे स्पष्ट होईल. कोणी मदत केली याची माहिती मिळेल. आरोपी शिरूर पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सुरवातीला मेडिकल करण्यात येत आहे. नंतर पोलीस ठाण्यात अटकेची प्रकिया पुर्ण केली जाईल. नंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या ग्लास हाऊसवर वनविभागाने कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी परिसर पेटविण्याचा प्रयत्न केला. या आगीत जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा देखील जळून नष्ट झाला. तर काही पशूंचा मृत्यू झाला. ही आग नेमकी कोणी लावली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या चर्चेत
बीडमधील एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. त्यामध्ये आणखी एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा त्याचबरोबर पैसे उडवताना, आणि त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले, सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसलेने अनेक वन्य प्राण्यांनाही मारून खाल्लं असल्याचं आणि त्यांच्या अवयवांची तस्करी केल्याची माहिती समोर आली. तसेच शिरूर कासार गावात त्याने वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रम करत घरही बांधल्याचं समोर आलं. त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये शिकारीचे सामान देखील सापडलं होतं.
वनविभागाने खोक्या उर्फ सतीश भोसलेचं घर पाडलं
एकीकडे खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली, तर दुसरीकडे वनविभागाने त्याच्या घरावर नोटीस धाडली. 48 तासांमध्ये त्याला कोणतंही उत्तर न आल्याने वनविभागाने कारवाई करत खोक्या भोसलेचं घर बुलडोझरने पाडलं. त्यावेळी घरातील वस्तू बाहेर आणून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अज्ञाताने त्याच घर आणि सामान पेटवून देण्याचा प्रयत्न केला, त्या घटनेमध्ये त्याच्या घरातील सामान आणि जनावरांचा चारा त्याचबरोबर काही पशूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आग कोणी लावली, याचा पोलिस तपास करत आहेत.
जीवनावश्यक वस्तूही खाक
वनविभागाच्या कारवाईनंतर गुरुवारी रात्रीच्या वेळी अज्ञाताने खोक्या भोसलेचे पाडलेलं घर पेटवून दिलं. घराच्या बाजूला चिटकूनच आग लावण्यात आली. यामध्ये काही जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. पोलिसांनी सतर्कता दाखवत ही आग विझवली.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. आधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. वन्य प्राण्यांना मारणे, त्यांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे असं कोणी करत असेल तर शिकार करणाऱ्या लोकांवरती कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.