मुंबई : विधानसभा अधिवेशनाचा बुधवारचा दिवस गाजला तो बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चर्चेमुळे (Santosh Deshmukh Murder Case). मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी नवीन दावा केला. ज्या सुदर्शन घुलेची देशमुखांसोबत मारहाण झाली त्याला त्याच्या 'आका'चा फोन आला असं धस म्हणाले. त्यामुळे या हत्या प्रकरणात आरोपींना आदेस देणारा आका कोण असा सवाल आता उपस्थित होतो. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील हा आका कोण हे सर्वांना माहिती आहे असं म्हणत धस यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
Suresh Dhas Vidhansabha Speech : आमदार सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणी मांडलेले मुद्दे
तीनदा आमदार होणं सोपं आहे. पण गावचा तीनवेळा सरपंच होणं अवघड आहे. एकदा लोकनियुक्त सरपंच झाला. गावातल्या लेकराला मारलं म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला जाब विचारला. सुदर्शन घुले याने मस्साजोगच्या एका दलित वॉचमनला मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या सरपंचालाही घुलेने मारली. मग त्यावर सरपंचानेही मारलं. त्या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी आणि अॅस्ट्रॉसिटी केस दाखल करण्यासाठी संतोष देशमुख पोलिस ठाण्यात गेले. पण त्यांना तिथे बसवून घेण्यात आलं. त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. कंपनीची फिर्याद आणि दलित मुलाची फिर्यादही दाखल करून घेण्यात आली नाही. त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद करून घेतली आणि त्यांना हाकलून देण्यात आलं.
यांचा कोण आका आहे, त्याचं ऐकून पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यात आली नाही हे तपासलं पाहिजे. भोसले नावाचा पोलिस हा सुदर्शन घुलेला घेऊन पूर्ण शहरात फिरत होता. महाजन नावाच्या पोलिस निरीक्षकाच्या गाडीतून आरोपी फिरत होते.
सोमवारी या आरोपी सुदर्शन घुले आणि पोलिस उपनिरीक्षक हे हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी संतोष देशमुखचा भाऊ हा त्याच हॉटेलमध्ये चहा पित होता. त्याला पोलिसांनी बोलवून घेतलं आणि त्यालाच विचारलं. त्यावर उद्या भावाला घेऊन या असं पोलिसाने सांगितलं.
दुसऱ्या दिवशी संतोष देशमुख केज पोलिस ठाण्याला केस मिटवण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसींनी आरोपींचे ऐकून केस मिटवली नाही. त्यामुळे संतोष देशमुख त्याच्या आतेभावासोबत परत निघाला. त्यावेळी दोन गाड्यांमधून आलेल्या आरोपींनी संतोष देशमुखचं अपहरण केलं.
आरोपी सुदर्शन घुले याचं सहा पत्र्याचं घर आहे. सहा पत्र्याचं घर असलेला आरोपी स्कॉर्पिओमधून फिरतो. त्याला ती गाडी बक्षीस म्हणून कोण दिली?
कसल्याही प्रकराची परवानगी नसताना 300-300 हायवा गाड्या वाळूची वाहतूक करतात. त्याला काही रॉयल्टी नाही, काहीही नाही. दररोज त्या माध्यमातून कोटी रुपये कमावल्याशिवाय हे लोक शांत बसत नाहीत. त्या कुणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध घेतला पाहिजे.
आता दिल्लीवरून आल्यानतंर त्या अवधा कंपनीची खंडणीची तक्रार दाखल करून घेण्यात आली. जर शुक्रवारीच या आरोपींच्या विरोधात तक्रार घेतली असती तर हत्या करण्याची घटना झाली नसती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका महिलेचाही समावेश होता. तिचीही चौकशी केली पाहिजे.
संतोषचा भावाने विष्णू चाटेला 35 फोन केले. त्यावेळी 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईल असं सांगितलं गेलं. संतोष देशमुखच्या पाठीवर एक इंचही जागा राहिली नव्हती इतकं मारलेलं. त्याला मारताना एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून दाखवण्यात आला. तो कॉल कुणाला केला होता याची चौकशी करावी. संतोषच्या पाठीवर दोनशे वेळा ठोके मारले. त्यामुळे दोन लिटर रक्त गोठले होते असं एका डॉक्टरने सांगितलं. कळंब तालुक्यातील गावात संतोषचा मृतदेह सापडला आणि पोलिसानी त्याला पोस्टमार्टमसाठी पाठवलं.
बीडमध्ये 1200 ते 1300 पिस्तुलधारक आहेत. त्यांच्या सर्वाच्या पिस्तुल जप्त केल्या पाहिजेत. शुक्रवारी ज्यांनी कुणी पोलिसांना फोन करून तक्रार नोंद करून घेऊ नयेत असं सांगितलं त्याची चौकशी झाली पाहिजे.
विमा कंपन्यांची टेक्निक वापरून, आरोपींच्या एक वर्षांचे रेकॉर्ड काढावं. तो कुणाकुणाला भेटला याची माहिती घ्यावी. संतोष देशमुख हा भाजपचा बूथ प्रमुख होता. लायटरने त्याचे डोळे जाळले. हे सगळं ज्याने करायला लावले त्या 'आका'ला अटक केली पाहिजे.
ही बातमी वाचा: