बीड : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केल्यानंतर आता त्याला धसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवर बोलू नये, त्यांनी आपल्याला शहाणपणा शिकवू नये असा सल्ला सुरेश धस यांनी दिला. परभणीतील लाँग मार्चमधील आपली क्लिप तोडून मोडून दाखवली असा दावा त्यांनी केला.


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे, भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पोलिसांची बाजू घेतल्याबद्दल, निशाण्यावर आले. सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी परभणीत लाँग मार्च काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी, पोलिसांना मोठ्या मनाने माफ करावं अशी विनंती केली. पण आता त्यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


काय म्हणाले सुरेश धस? 


सुरेश धस म्हणाले की,  लाँग मार्चमध्ये जमलेल्या आंदोलकांची भूमिका ही पोलिस अधीक्षक, महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करावी अशी होती. पण जे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत किंवा कुठेच रेकॉर्डवर नाहीत त्यांच्यावर कारवाई केली तर पोलिस दलाच्या मनोबलावर परिणाम होईल. त्यामुळेच आपण या पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं. पण आपली क्लिप ही तोडून-मोडून दाखवण्यात आली. 


जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवर बोलू नये. त्यांनी आपल्याला शहाणपणा शिकवू नये असा टोला सुरेश धस यांनी लगावला.


सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो. पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. आव्हाड साहेब, तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही.


पोलिसांची पाठराखण करू नका, सूर्यवंशी कुटुंबीयांची मागणी


पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी, आधी पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, केवळ निलंबन मान्य नाही अशी भूमिका घेतली आहे.  तसंच या प्रकरणात शिष्टाईसाठी आलेल्या आमदार सुरेश धसांनी पोलिसांची पाठराखण करू नये अशीही टीका सोमनाथच्या कुटुंबीयांनी केली.


जितेंद्र आव्हाडांची टीका


सुरेश धस यांनी परभणी लाँग मार्चमध्ये बोलताना, मोठं मन करा आणि पोलिसांना माफ करा असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्र्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. आव्हाडांनी सुरेश धसांचा व्हिडीओ शेअर केला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफ करा असं तुम्ही कसं म्हणू शकता असा प्रश्न विचारला. 


ही बातमी वाचा: