बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी नेमून काही न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. या प्रकरणात आपण कोणत्या मंत्र्याचं नाव घेत नाही तर खंडणी मागणाऱ्या आरोपी वाल्मिक कराडचे नाव घेत आहोत. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही हत्या झालीच नसती असा आरोप रोहित पवारांनी केला. हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं गावकरी म्हणतात, मग त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. आमदार रोहित पवार हे मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेले होते.
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला अटक करा
आमदार रोहित पवार म्हणाले की, "संतोष देशमुख यांच्यासोबत अतिशय भीतीदायक आणि अमानवीय घटना 9 तारखेला घडली. या घटनेत अनेक मोठ्या लोकांचा हात आहे. हे सामान्य लोकांना देखील माहीत आहे. वाल्मिक कराड यांच्या विरोधात पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात मास्टर माईंड हा वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराड याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे. त्याचे सर्व फोन कॉल्स तपासले पाहिजेत."
रोहित पवार पुढे म्हणाले की, "पवनचक्की प्रकल्प परिसरात 6 तारखेला वाद झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी साधी तक्रार देखील घेतली नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता खंडणीप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणात जी नावं आहेत तीच नावं ही हत्या प्रकरणात आहेत. त्यामुळे या सर्वांचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड हाच असून त्याला अटक झाली पाहिजे."
SIT तपासाचा काही फायदा नाही
या प्रकरणात एसआयटी तपास करणार आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे. पण या आधी कोकणात एका पत्रकाराची हत्या झाली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 16 जणांचा मृत्यू झाला होता. बीडमध्ये दंगल झाली होती. या सर्व प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. पण त्याचा अहवाल किंवा त्यावर काय कारवाई झाली याची काही अपडेट आली आहे का? असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.
संतोष देशमुख प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि त्याचा चौकशी अहवाल हा जनतेसमोर मांडण्यात यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकत्व घ्यावं
बीड जिल्ह्यामध्ये एखादा चांगला अधिकारी आला तर त्याला दीड-दोन महिन्यात बाहेर काढलं जातं. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
ही बातमी वाचा: