Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.  त्यामुळं त्याला लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी मस्साजोगमधील गावकरी उपोषण करणार आहेत. हा विषय संवेदनशील असल्याचे जरांगे म्हणाले. यावेळी 
मस्साजोग गावातूनच मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवल्याचे जरांगे पाटील म्हणाले.  

Continues below advertisement


मस्साजोगचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेला उपोषण करणार आहेत. हा खूप संवेदनशील विषय आहे. निवेदन असलं नसलं तरी सहकार्य करा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करा आणि त्यांची चौकशी करा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच कृष्णा आंधळेला अटक करा. संतोष देशमुक हत्याप्रकरणात सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करा. बाकीच्या आरोपींची सीडीआर काढा, या मास्साजोगमधील गावकऱ्यांच्या आणि देशमुख कुटुंबाच्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.


धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा


वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली आहे. प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी केले नाही. त्यांना सर्वात जास्त यातील माहिती आहे. यातील कोणत्याच आरोपींना सह आरोपी केले नाही. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा त्यांनी आंदोलन दडपले होते असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  या ठिकाणी कारवाई पोलिसांकडून होत नाही. चारशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे देखील यात आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे. यातील आरोपी त्यांचेच आहेत, त्यामुळं त्यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी जरांगे यांनी केली. 


आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत?


सरकारला माहित आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात आहे. खंडणीतून हा खून झाला आहे. यातील बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे आहे. यातील आरोपींना मदत करणारे सह आरोपी का नाहीत? असा सवालही जरांगे यांनी केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. माझे आरोप नाही तर हे सत्य आहे. सरकार यात बदनाम होत आहे. ही केस अंडरट्रायल चालली पाहिजे आणि फाशी झाली पाहिजे. आरोपींना अटक करतील अशी शक्यता नाही. मुख्यमंत्र्यांनी यात आदेश द्यावे. आम्ही सर्वजण त्यांची पाठ थोपटू असे जरांगे म्हणाले.