बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणी प्रकरणातून निर्माण झालेल्य वादातून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या हत्याप्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर महायुती सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र, आता या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ.बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड आणि एसआयटीतील एका अधिकाऱ्याच्या फोटोचा दाखला देत हा गंभीर आरोप केला. संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख IPS बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन प्रेमाचे संबध आहेत पहा हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडनुक काळात धंनंजय मुंडे चा कार्यकर्ता असल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अत्यंत खास माणूस आसुन गेले 10 वर्षे तो बीड LCB मध्येच आहे आणि वाल्मीकसाठी काम करतोय, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात काही निर्णय घेणार का, हे पाहावे लागेल.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीत कोण-कोण?
एसआयटीच्या प्रमुखपदी पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना नेमण्यात आले. तर उर्वरित पथकात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह शिवलाल जोनवाल आणि उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज राजेंद्र वाघ, पोलीस नेते चंद्रकांत एस. काळकुंटे, पोलीस नायक बाळासाहेब देविदास आखाबरे, पोलीस हवालदार संतोष भगवानराव गित्ते यांचा समावेश आहे.
आणखी वाचा