बीड : धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवू असं कोणी म्हणत असेल तर परळी आणि महाराष्ट्रातील जनता ते होऊ देणार नाही असा इशारा देत मुंडेंसमोर कोणतंही पद हे छोटं असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी गु्न्हा केला तर त्याला साहेब दोषी कसे असा सवाल त्यांनी विचारला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर परळीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली. 


धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर परळीतील त्यांच्या जगमित्र कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसत होता. नेहमी कार्यकर्त्यांनी गजबजलेले हे कार्यालय ओस पडल्याचं दिसून आलं. त्या ठिकाणी काही मोजके कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. 


एका कार्यकर्त्याने सांगितलं की, "धनंजय मुंडे यांनी जो निर्णय घेतला आहे, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. हे नेतृत्व आभाळाएवढ्या उंचीचं, कुणी सुपारी घेऊन ते संपणार नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी एक चांगलं नेतृत्व संपवलं जात आहे. त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. चार्जशीटमध्ये कोणतंही नाव नाही. ज्यांची नावं त्यामध्ये आहेत त्यांना शिक्षा द्यावी."


नैतिकता आणि तब्येतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांच्यासमोर कोणतंही पद छोटे आहे. त्यांची तब्येत आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे एका समर्थकाने सांगितलं.


धनंजय मुंडे हे ओबीसीचा बुलंद आवाज आहेत. 


संतोष देशमुख यांचे फोटो पाहून महाराष्ट्र दुःखी झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा ही धनंजय मुंडे यांनी पहिल्यापासून भूमिका घेतली. पण धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप समर्थकांनी केला. 


परळीकरांसाठी दुसरी दुःखद घटना


एक कार्यकर्ता म्हणाला की, परळी आणि बीडसाठी ही दुसरी दुःखद घटना आहे. पहिली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची आणि दुसरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची.  ज्यांनी गुन्हा केला ते दोषी आहेत. कार्यकर्त्यांनी गुन्हा केला तर साहेब कसे दोषी?


फडणवीसांची इशारा, मुंडेंचा राजीनामा


संतोष देशमुख हत्येप्रकरणी अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचं पत्र त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवलं. मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आणि राज्यपालांनीही तो स्वीकारला. पण हा राजीनामा सहजासहजी घडला नाही. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासून आग्रही होते. पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते. अखेर फडणवीसांनी हकालपट्टी करण्याची तंबी दिल्यानंतर चित्र बदललं आणि मुंडेंनी राजीनामा दिला. 


 



ही बातमी वाचा: