बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासातील काही गोष्टी संशयास्पद असल्याचे वक्तव्य बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. आरोपी विष्णू चाटे (Vishnu Chate) याचा मोबाईल फोन अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये संशय वाढत आहे. जोपर्यंत सीडीआर तपासला जाणार नाही, तोपर्यंत यात आणखी गुन्हेगार आहेत, त्यांचा  रोल समजू शकणार नाही, असे संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी म्हटले. ते रविवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांना राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांची मदत मिळत असल्याचा आरोप केला. वाल्मिक कराड एकटा पोलीस अधीक्षक (एसपी) दर्जाच्या अधिकाऱ्याला थांबवण्याचे काम करु शकत नाही. त्याला धनंजय मुंडे यांनी सहकार्य केले आहे. पुण्यातील रुग्णालयात वाल्मिक कराड याला कोणी दाखल केले होते, याचा तपास करा. पुण्यातून फरार झाल्यानंतर वाल्मिक कराड कुठे गेला? सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या अनुषंगाने तपास करुन ज्यांनी वाल्मिक कराडला मदत केली त्यांना पण या गुन्ह्यात आरोपी केले पाहिजे, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. 


धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे. संतोष देशमुख हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवले पाहिजे. मी पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो की, खंडणी आणि हत्या हा एकच आहे. संतोष देशमुख यांचा खून हा खंडणीमुळेच झालेला आहे. विष्णू चाटेच्या मोबाईल मध्ये नक्कीच कुणाचेतरी रेकॉर्ड आहेत. यावर नक्की कुणाचा वरदहस्त हे तपासला पाहिजे. मी यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून वेळोवेळी या प्रकरणात तपास करण्याची मागणी केली आहे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.


महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास  एसआयटी किंवा सीआयडीमार्फत करावा; मुंडेंच्या पत्नीची मागणी


आमच्या प्रकरणाची बीड पोलीस अधीक्षकांनी जास्तीत जास्त दखल घ्यावी. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास  एसआयटी,सीआयडी मार्फत करावा नाहीतर आम्ही कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.


महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला होता. आम्ही त्यांना भेटलो होतो. मात्र, आता त्यांच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही. आम्ही बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून त्यानंतर त्यांना तीन दिवसाची मुदत देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आणखी वाचा


वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण