बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासात सीआयडीने सोमवारी एक महत्त्वाचे पाऊल उचलले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरही मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सीआयडी (CID) पथकाने आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने घेतले. या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी (Santosh Deshmukh Murder Case) थेट संबंध आहे. त्यामुळे आरोपी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुन करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराड यांचा आवाज जुळल्यास त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.
सीआयडीच्या पथकाने बीड (Beed News) शहर पोलीस ठाण्यातच वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने गोळा केले. खंडणी प्रकरणाच्या तपासात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. यापूर्वी सीआयडीने संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या विष्णू चाटे याच्याही आवाजाचे नमुने घेतले होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचे नमुने याप्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.
वाल्मिक कराड याने पवनचक्की निर्मिती करणाऱ्या आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यासाठी विष्णू चाटे हा आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला होता. तिथून विष्णू चाटे याने फोन लावून कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आणि वाल्मिक कराड यांचे बोलणे करुन दिले. त्यानंतर कंपनीचे अधिकारी विष्णू चाटे याच्यासोबत वाल्मिक कराड यांना भेटायलाही गेले होते, असाही आरोप करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एसआयटी बरखास्त
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील अनेक अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड याच्याशी लागेबांधे असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला होता. त्यामुळे सोमवारी ही एसआयटी बरखास्त करुन नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. जुन्या एसआयटी पथकात 9 जणांचा समावेश होता. तर नव्या एसआयटी पथकात सहा जणांचा समावेश आहे. पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना एसआयटीच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे. नव्या एसआयटी पथकात अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, पोलीस निरीक्षक सुभाष मुठे, पोलीस निरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, पोलीस हवालदार शर्मिला साळुंखे, पोलीस हवालदार दिपाली पवार यांचा समावेश आहे.
आणखी वाचा