बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती त्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी या प्रकरणातील सहा आरोपी गाडी सोडून पळून जात असल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. हा सीसीटीव्ही धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरातील पारा चौकातील संध्याकाळी 7 वाजताचा आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पारा चौकात गाडी सोडली आणि पळून गेले. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सहाजण पळून जाताना दिसत आहेत.
चार तासात आरोपींनी काय-काय केलं?
सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर हे सहा आरोपी धाराशिवपासून जवळपास 70 ते 80 किमी अंतरावर असलेल्या वाशीमध्ये पोहोचले. हत्येमध्ये वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ घेऊन हे आरोपी वाशीमध्ये पोहोचले. पण पारा चौक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
संतोष देशमुखांचे अपहरण 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होतं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची हत्या होते आणि संध्याकाळी सात वाजता हे आरोपी वाशीमधून पळताना दिसत आहेत. या चार तासांच्या काळात नेमकं काय घडलं आणि आरोपी वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलिस करत आहेत.
वाशीपर्यंत हे सहा आरोपी एकत्रच होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
कृष्णा आंधळे अद्याप फरार
संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा दोन महिन्यांपासून फरार आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा अशी शक्यता काही जणांनी वर्तवली आहे. पोलिस अद्याप त्याचा शोध घेत असून त्याला अटक झाल्यास या प्रकरणाचे अंतिम सत्य सर्वांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हत्या प्रकरणात जी काळी स्कॉर्पिओ वापरण्यात आली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.