बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या घटनेने राज्यातील राजकारण देखील मोठ्या प्रमाणावर तापलं. या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हत्या कशा पद्धतीने केली याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.(Santosh Deshmukh Case)
या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो घेतले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे, तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे.देशमुख हत्या प्रकरणाची बुधवारी सुनावणी झाली, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्येचा घटनाक्रम न्यायालयात सांगितला होता. तशाच पद्धतीने कबुली जबाब आरोपींनी दिल्याची माहिती समोर आली आहे. अॅड. निकम यांनी या सर्व प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड असून, सर्व पुरावे असल्याचा दावा केला होता. अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबाचा तपशील माध्यमांच्या हाती आला असून, क्रूर पद्धतीने देशमुख यांना संपवल्याचे स्पष्ट झाले आहे.(Santosh Deshmukh Case)
देशमुखांच्या हत्येच्या वेळी वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 19 पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत. या कारच्या दरवाजाच्या काचेवर असलेले सुधीर सांगळेचे ठसे फॉरेन्सिक तपासणीत मॅच झाले आहेत. सुदर्शन घुले याची ही गाडी असून, त्याच गाडीतून आरोपी वाशीपर्यंत गेले होते. तेथे ही गाडी सोडून आरोपी जंगलाच्या दिशेने पळत गेले. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गाडीची संपूर्ण तपासणी पोलिस, फॉरेन्सिक लॅबमार्फत करण्यात आली होती. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात काही बाबी समोर आल्या आहेत. गाडीमधील फिंगरप्रिंटस् आणि इतर काही पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. या गाडीत मिळालेले फिंगरप्रिंटस्चे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्यूरोने दिला आहे.
देशमुखांना मारहाण केलेली बांबूची काठी जप्त
संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करताना वापरलेली बांबूची काठी जप्त करण्यात आली आहे. आरोपी प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवत त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपामधून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी काढून दिलेली होती. घुलेने मारहाण केलेले ठिकाण दाखवत माऊली कारखाना ते टाकळी रोडवर संतोष देशमुख यांना विविध हत्यारांनी मारून त्यांचा खून केला होता, असे त्यानी पंचांसमक्ष सांगितले होते.
मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करताना 15 व्हिडीओ आणि8 फोटो घेतले होते. हा डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे, तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात झाल्याचा पहिला व्हिडीओ आहे, तर शेवटचा व्हिडीओ हा 5 वाजून 53 मिनिटांचा असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देशमुख विव्हळत असल्याचा लहान आवाज येत आहे. तब्बल दोन तास आरोपी संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण करत होते आणि व्हिडीओही काढत होते.
त्या 15 व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओ 1: 9 डिसेंबर 2024 रोजी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली आहे. मोबाईलमधला हा पहिला व्हिडीओ एक मिनिट दहा सेकंदांचा आहे. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना पाईप आणि वायरप्रमाणे असलेल्या हत्याराने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.
व्हिडीओ 2 : 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.47 वाजता 53 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये देशमुखांना आरोपी शिवीगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करत आहेत. आरोपी देशमुख यांची पॅंट काढत आहेत.
व्हिडीओ 3 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.38 वाजता 35 सेकंद देशमुखांना मारहाण सुरू असताना दुसरा आरोपी वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे.
व्हिडीओ 4: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.51 वाजता दोन मिनिट चार सेकंद आरोपी शिवीगाळ करून पाईपने मारहाण करताना व्हिडिओ काढत आहेत. व्हिडिओ शूटिंग काढणारा महेश केदार असल्याचं दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेची गाडीही दिसत आहे.
व्हिडीओ 5: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.52 वाजता 7 सेकंद या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसवत आहेत.
व्हिडीओ 6 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.53 वाजता ३६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये देशमुख यांना तोंडावर, शरीरावर मारहाण झालेली दिसत आहे.
व्हिडीओ 7 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसतो.
व्हिडीओ 8 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 4 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना बळजबरीने काही तरी विचारताना दिसत आहेत.
व्हिडीओ 9: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.55 वाजता 52 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर, तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे. तसेच, सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असं जबरदस्ती म्हणायला लावलं जातं.
व्हिडीओ 10 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता दोन सेकंद देशमुखांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसवून पाईपने मारहाण केली व दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत आहे.
व्हिडीओ 11 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता 5 सेकंद जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत होता.
व्हिडीओ 12 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.59 वाजता 12 सेकंद देशमुखांना जबरदस्तीने केस ओढून बोलायला लावून व्हिडिओ शूटिंग केलं जातं.
व्हिडीओ 13: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.34 वाजता 1.44 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना स्कॉर्पिओ गाडीजवळ अंडरवेअरवर झोपवल्याचे दिसते, आरोपी हे देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पँट घालताना दिसतात.
व्हिडीओ 14: 9 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.35 वाजता 1.04 सेकंद देशमुखांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियन फेकून देताना दिसत आहे.
व्हिडीओ 15 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.53 वाजता 24 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कण्हत असताना आवाज येतो.