Raj Thackeray news बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे बीडमधील (Beed) परळी कोर्टात (Parli Court) हजेरी लावणार आहेत. परळीमध्ये दाखल गुन्ह्यात कोर्टाने समन्स बजावला होता. त्यामुळे राज ठाकरे येत्या 12 जानेवारीला कोर्टात प्रत्यक्ष हजेरी लावतील, असं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्यावर 2008 मध्ये राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी परळीतही गुन्ह्याची नोंद झाली होती. या खटल्याच्या सुनावणीला राज ठाकरे दोनवेळा गैरहजर राहिले होते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते.
अटक वॉरंटनंतर राज ठाकरे परळीत?
दरम्यान, 2008 मधील खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट काढल्यानंतर, ते आता कोर्टात हजेरी लावणार आहेत. 12 तारखेला राज ठाकरे परळी कोर्टात उपस्थित असतील अशी माहिती मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज ठाकरे यांना मुंबईत ऑक्टोबर 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. या घटनेचे परिणाम राज्यभर उमटले होते. या अटकेच्या विरोधामध्ये राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड, बसेसवर दगडफेक झाली होती. असाच प्रकार परळीमध्येसुद्धा घडला होता. परळीतील धर्मापुरी पॉईंट येथे एसटी बसेसवर दगडफेक झाली होती. ज्यामध्ये एसटी बसचे नुकसान झाले होते.
राज ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा
या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
जामीन मंजूर, पण गैरहजेरीमुळे समन्स
दरम्यान याप्रकरणात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, खटल्याच्या सुनावणीवेळी राज ठाकरे न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट सुद्धा जारी करण्यात आले आहे.
यापूर्वी नवी मुंबईतील बेलापूर कोर्टाकडून समन्स
दरम्यान, राज ठाकरे यांना यापूर्वी बेलापूर कोर्टानेही समन्स बजावलं होतं. वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकाऊ भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यावेळी 6 फेब्रुवारी 2022 रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.
संबंधित बातम्या
Raj Thackeray : राज ठाकरेंविरोधात कोर्टाकडून वॉरंट, आज कोर्टात हजर राहणार, नवी मुंबईत बॅनरबाजी