बीड : आपला राजकीय वारस कोण असावा याचा निर्णय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी 2008 सालीच घेतला होता. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पंकजा (Pankaja Munde) याच गोपीनाथ मुंडेच्या वारस निश्चित झाल्या असं मत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) म्हणाले. भुजबळांनी याबाबत त्यांचं मत नोंदवलं नसतं तर बरं झालं असतं असा टोलाही त्यांनी लगावला.
आपण पाचव्यांदा निवडून आलो आहोत, आपल्या विजयाचे श्रेय धनंजय मुंडेंनी घेऊ नये. गेल्या 60 वर्षांपासून सोळंके कुटुंबीय राजकारणात आहे, त्यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचा उगमही झाला नव्हता असंही प्रकाश सोळंके म्हणाले.
एखाद्याच्या कुटुंबात जन्माला आला म्हणून वारस होत नाही, गोपीनाथ मुंडे खूप मोठे नेतृत्व होतं. आचा बहीण-भाऊ एकत्र आले आहेत, त्यांनी एकत्रित कसे राहता येईल हे बघितले पाहिजे असा टोलाही सोळंके यांनी लगावला.
Prakash Solanke Statement : पंकजा याच गोपीनाथ मुंडेंच्या वारस
छगन भुजबळांच्या वक्तव्यावर बोलताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, "1995 मध्ये युतीचे पहिल्यांदा शासन आले. त्यामध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. 1995 ते 2008 स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा निवडणुका आम्ही सोबत लढवल्या. गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासू सहकारी म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मात्र छगन भुजबळ यांनी आता दुर्दैवी वाद निर्माण केला आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार म्हणून निवडणुका लढवल्या आहेत."
गोपीनाथ मुंडे यांनी 2008 मध्ये वारसदार कोण याचा निर्णय घेतला होता. पंकजा मुंडे यांचे नाव गोपीनाथ मुंडे यांनी घेतलं होतं. वारस म्हणून पंकजा याच गोपीनाथ मुंडे यांच्या मनात होत्या याबाबत दुमत नाही. कारण त्यावेळी धनंजय मुंडे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यावर भुजबळांनी स्वतःचं मत नोंदवलं नसतं तर बरं झालं असतं अस प्रकाश सोळंके म्हणाले.
Prakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना इतिहास माहिती नाही
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्रकाश सोळंके म्हणाले की, "माझ्या घरात माझा पुतण्या वारसदार आहे हे मी या आधीच सांगितलं आहे. माझ्या विरोधात आडुस्कर आणि निर्मळ यांना कोणी उभे केले हे सगळ्यांना माहीत आहे. इतके होऊनही मी पाचव्यांदा निवडून आलो. धनंजय मुंडे यांना राजकीय इतिहास फार काही माहीत नाही. स्वर्गीय पंडित अण्णा यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नियुक्त करताना धनंजय मुंडे यांनी काय गोंधळ घातला होता हे मी आता सांगणार नाही. पंडित अण्णा मुंडे यांचा नाव मी आणि स्वर्गीय मुंडे साहेबांनी जाहीर केलं होतं."
Prakash Solanke On Pankaja Munde : धनंजय- पंकजा मुंडेंचा त्यावेळी उगमही नव्हता
धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले की, "सोळंके कुटुंबीय गेल्या 60 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात काम करत आहेत. 1978 मध्ये धनंजय मुंडे काय करत होते हे सांगता येणार नाही. मला किंवा विजय पंडित यांना उरावर घेतलं असे धनंजय मुंडे म्हणाले. पण त्यांना आम्ही काय केलं हे माहीत नाही. त्यावेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकारणातही नव्हते, त्यांचा उगमही झाला नव्हता. ज्यांचा उगमही त्यावेळी राजकारणात झाला नव्हता त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचे श्रेय घेऊन नये."
Prakash Solanke On Election : झेडपी निवडणुकीत युती नको
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, "पक्षविरहित आघाड्या या निवडणुकीत होणे अवघड आहे असे मला वाटते. त्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेऊ शकतात. स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय होत नाही. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोनच पक्षांमध्ये स्पर्धा आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचे असेल तर युती शक्य नाही. वेगवेगळे लढून निवडणूक नंतर एकत्र येणे कधीही चांगले."
Prakash Solanke On Maratha Reservation : कुणबी नोंदीचे श्रेय मनोज जरागेंना
इंग्रजांच्या काळातील नोंदणीचा अधिकार हा तिथल्या राजाकडे होता. त्या ठिकाणाहून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत होतं. मात्र मराठवाड्यात निजामाचे राज्य होते. त्यामुळे त्यावेळच्या नोंदींचा आधार महत्त्वाचा आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये पावणे दोन लाख लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं याचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना आहे असं मत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलं.
Prakash Solanke On Chhagan Bhujbal : भुजबळांनी नाशिककडे लक्ष द्यावे
भुजबळांचे बोलणे पक्षाच्या शिस्तीत कुठेही बसत नाही. लक्ष्मण हाके सुपारीबाज माणूस आहे, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. हाकेची किंमत आमच्या लेखी शून्य आहे असं प्रकाश सोळंके म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहून सरकारच्या जीआरला विरोध करणे चुकीचे आहे. त्यांनी बाहेर पडून विरोध करावा. नाशिक मध्ये हजारो कुणबी प्रमाणात्राचे वाटप झाले. भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात लक्ष द्यावे. मराठवाड्यात केवळ दोन लाखावरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले आहे."
ही बातमी वाचा: