बीड : मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ऊसतोड मजूर संघटनांच्या मागण्यांसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) रस्त्यावर उत्तरणार आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऊसतोड मजूर संघटना (Sugarcane Workers Union) 6 जानेवारीला आंदोलन करणार आहेत. ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार असून, स्वतः पंकजा मुंडे या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 


पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाच उसतोड मजूर संघटना या 5 जानेवारीनंतर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनामध्ये स्वतः पंकजा मुंडे यादेखील सहभागी होणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू देणार नाही असा इशारा ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याच संदर्भात पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व संघटनांनी चर्चा केली आहे.  त्यानंतर आज ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


'या' आहेत मागण्या...



  • ऊस तोडणीसाठी मजुरांना देण्यात येणाऱ्या दरात दुप्पट वाढ करण्यात यावी.

  • मुकादमांना 19 टक्के ऐवजी 35 टक्के कमिशन देण्यात यावे.

  • त्याचबरोबर ट्रॅक्टर आणि ट्रकमधून होणाऱ्या वाहतुकीच्या दरामध्ये देखील वाढ करण्यात यावी

  • ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्यात शाळा आणि वस्तीग्रह उभारण्यात यावेत.


आंदोलन काळात सर्व कारखाने बंद करण्यात येतील


आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर आणि मुकादम संघटनांकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, याचवेळी या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेवटी पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता 5 जानेवारीपर्यंतची साखर संघाला मुदत देण्यात आली आहे. मात्र, 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 6 जानेवारीला पंकजा मुंडे या आपल्या संघटनांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.  या काळात सर्व कारखाने बंद करण्यात येतील असेही सांगण्यात आले आहेत. 


अन्यथा राज्यात कोयता बंद राहील


यापूर्वी 25 डिसेंबरचा साखर संघाला अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची साखर संघाशी चर्चा झाली आणि त्यांनी 5 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागीतीली. त्यामुळे आता साखर संघाला 5 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. मात्र, तरीही निर्णय न झाल्यास आम्ही 5 जानेवारीनंतर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यासह रस्त्यावर उतरून ऊसतोड मजूर संघटना आंदोलन करणार आहे. यावेळी राज्यात कोयता बंद राहील. मशीनने ऊस तोडणी केल्यास जादा दर दिला जात आहे, मात्र, आमच्या ऊस तोड कामगारांना योग्य दर दिला जात नाही. त्यामुळे आमच्या मजुरांची खूप पिळवणूक सुरु आहे. मागील तीन वर्षांपासून आमच्या मागण्या प्रलंबित असून, मागीच चार महिन्यापासून सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र, साखर संघ आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली असल्याची माहिती, ऊसतोड मजूर संघटना अध्यक्ष सुखदेव सानप यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचे 36 तास सुरु असलेले काटा बंद आंदोलन मागे