बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानंतर झालेल्या आरोपांवरून आणि दबावानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता भाजप आमदार पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु होते. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलताही येत नव्हते. त्यांनी स्वत: ट्विट करत याबद्दलची माहिती दिली होती धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याने भेट घेतल्याची चर्चा आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
रात्री 9च्या आसपास भेटीसाठी
पंकजा मुंडे यांनी नुकतीच धनंजय मुंडे यांच्या निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर त्यांची भेट घेतली. रात्री 9च्या आसपास त्या त्यांच्या कारने धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर पोहोचल्या. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची ही पहिलीच भेट आहे.
आजारपणाचं कारण देत दिला राजीनामा
धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. धनंजय मुंडे बेल्स पाल्सी आजाराने ग्रस्त आहेत. या दरम्यानच वाल्मिक कराडशी असलेले जवळचे संबंध आणि वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचं पोलिसांनी आरोप पत्रात लिहलं आहे, त्यानंतर गंभीर आरोप झाले. तसेच त्यांचा जवळचाच व्यक्ती या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील फोटो समोर आल्यामुळे त्यांच्यावर दबाव वाढला अखेर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला.
राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया?
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली होती. यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.
धनंजय मुंडेंनी काय केली होती पोस्ट?
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एक्सवरती पोस्ट लिहून प्रतिक्रिया दिली होती. 'बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे'.