बीड: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे समर्थक पांडुरंग सोनवणे (Pandurang Sonawane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.  बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा  गावात ही धक्कादायक घटना घडली.  पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला म्हणून पांडुरंगने आपले जीवन संपवलं असल्याचं जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.


पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्याच्या घराबाहेर अनेक समर्थकांनी गर्दी केली होती. तसेच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याचदरम्यान आता पंकजा मुंडेंचे समर्थक असणाऱ्या पांडुरंग सोनावणे यांनी आत्महत्या केल्याने बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग सोनावणे यांच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 


धनंजय मुंडे काय म्हणाले?


धनजंय मुंडे ट्विट करत म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला म्हणून काहीजण आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेत असल्याच्या काही दुर्दैवी घटना घडत आहेत. आपला एका निवडणुकीत पराभव झाला म्हणून स्वतःच्या प्राणांना पणावर लावून, स्वतःला इजा करून घेणे किंवा कोणतेही नुकसान करून घेणे हे आम्हाला प्राणांतिक वेदना देणारे आहे. मी असो किंवा पंकजाताई असो, हा पराभव स्वीकारला आहे. तुम्हीही आता जय-पराजयाच्या या विवंचनेतून बाहेर पडणे गरजेचे आहे, असं धनंजय मुंडेंनी सांगितले. 


धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, एक पराभव झाला म्हणून आपल्या सहकाऱ्यांनी आपले प्राण देणे, हे आमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करणारे आहे. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याआधी आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहीजे. एका वयस्कर आई-वडिलांचं लेकरू आपले प्राण गमावते ते दुःख पचवणे किती अवघड असते कुटुंबासाठी, याचा विचार करा...त्यामुळे आता या दुःखातून बाहेर या, पुढे अनेक संधी, अनेक वाटा आहेत, त्या आपण स्वीकारू आणि सर्वजण मिळून पुढे जाऊ. स्व. गोपीनाथ मुंडे, स्व.पंडित अण्णांनी आपल्याला स्वाभिमानाने लढायला शिकवलंय, ते विसरायचं नाही. पुन्हा नव्या उमेदीने लढत राहू. बस्स तुम्ही निराशा सोडून साथ द्या, असं आवाहन धनंजय मुंडेंनी केलं आहे. 


पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करा, बीडमध्ये झळकले बॅनर-


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह एकूण 46 खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांना मोदी सरकार 3.0 मध्ये स्थान मिळणार नाही. तर, महाराष्ट्रातून एकूण 5 मंत्र्याची नावे समोर आली आहेत. मात्र, बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुडेंचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि भावूक झाले आहेत. त्यातूनच, पंकजा मुंडेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे. बीड लोकसभेत यंदा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. तरीही, त्यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत आहे.  मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला बीड शहरभर पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेटमंत्रीपद द्यावं, अशा मागणीचे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे बीड शहरभर हे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे.


ही बातमी वाचा : 


मोठी बातमी : पंकजा मुंडे निवडून न आल्यास सचिन गेला, व्हायरल व्हिडीओनंतर सचिन मुंडे यांचा अपघाती मृत्यू