बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच राजीनाम्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. राजीनामा द्यायचा की नाही हे स्वत: धनंजय मुंडेंनी ठरवावं, असं मोठं वक्तव्य करत अजितदादांनी राजीनाम्याचा निर्णय मुंडेंवर सोपवला आहे. तर सिंचन घोटाळ्यावेळी माझ्यावर देखील आरोप झालेत, त्यावेळी मी राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हणालेत. पुरावा नसेल म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसेल, असं उत्तर अजित पवारांनी म्हटलं आहे, या सर्व घडामोडींवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणालेत बबनराव तायवाडे?
एबीपी माझाशी बोलताना बबनराव तायवाडे म्हणाले, अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते, मात्र पुढे त्या आरोपाचे काय झालं? आरोप सिद्ध झालेले नसतांनाही अजित पवारांना काही काळ सत्तेतून बाहेर राहावे लागले. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. आता तसे आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर धनंजय मुंडे यांचे पण नुकसान होईल, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.
तीन महिने झाले अजून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाही असे असतांना ओबीसींचे उभारणारे नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. सरकारकडे सर्व यंत्रणा आहे, सरकारने आधी सत्य शोधावे. त्या आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे.
राजीनाम्यावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयीचे पुरावे आमदार सुरेश धस यांनी सादर केले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप आरोप सिद्ध झालेला नाही किंवा चौकशीचा बाण त्यांच्याकडे रोखलेला नसताना त्यांचा राजीनामा का घ्यायचा," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांची पाठराखण केली. त्याचबरोबर, नैतिकतेच्या आधारे राजीनामा का घेतला जात नाही, या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "मी 34 वर्षे विविध खाती सांभाळली आहेत. स्वच्छपणे कारभार केला, तरीही सिंचन गैरव्यवहाराचे आरोप माझ्यावरती झाले. सचिवांकडून माहिती घेऊनच मी निर्णय घेत असतो. तरीही माझ्यावर आरोप झाले, त्यामुळे व्यथित होऊन मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. देशात अनेक घटनांमध्ये पूर्वी लालबहादूर शास्त्री, आर. आर. पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यानंतर अनेक घटना घडल्या, पण कुणी राजीनामा दिल्याचे मला आठवत नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे."