MLA Prakash Solanke : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे (Majalgaon Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकी (MLA Prakash Solanke) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खर्चून विधानसभा निवडणूक जिंकल्याचे वक्तव्य सोळंकी यांनी केलं आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या उमेदवारांनी 45 कोटी आणि 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. मी फक्त 10 ते 12 कोटी रुपये खऱ्चून निवडून आल्याची कबुली आमदार सोळंकी यांनी दिली आहे. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकारणामध्ये सर्वसामान्यांची कामं करणं महत्त्वाचं, पैसा दुय्यम
निवडणूक आली की कोणीबी येतं आणि निवडणुकीत उभे राहते. कुणीबी येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुकीत उभे राहतो अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळाली. पण मी ऐकलं की माजलगाव विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने निवडणुकीमध्ये 45 कोटी रुपये खर्च केले आहेत, असे लोक बोलतात. पण मला काही माहित नाही. दुसरा एक उमेदवार होता त्याने 35 कोटी रुपये खर्च केले असे लोक सांगतात. मी आपले फक्त दहा-बारा कोटी रुपये खर्च केले आणि निवडणूक जिंकल्याचे सोळंकी म्हणाले. राजकारणामध्ये सर्वसामान्यांची कामं करणं महत्त्वाचं आहे. पैसे दुय्यम असल्याचे सोळंकी म्हणाले. वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोळंकी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखांपेक्षा अधिक रक्कम प्रचारावर खर्च करता येत नाही, असे निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. मात्र, अशातच आमदार प्रकाश सोळंकी यांनी मी 10 ते 12 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाणार का? काही कारवाई होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: