बीड : जिल्ह्यातील धारूर शहरातील मोंढा मैदानावरील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सभा होत असून, पुन्हा एकदा त्यांनी आपल्या सभेतून सरकार आणि मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) हल्लाबोल केला आहे. तर, आमच्या हातात दंडूके आहे, मराठा समाज सरकारलाही पायाखाली तुडवू शकतो आणि भुजबळांमध्ये किती दम आहे पाहून घेऊ, असे वक्तव्य जरांगे यांनी या सभेत केले आहे. त्यामुळे, त्यांच्या याच वक्तव्यावर आता भुजबळ काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "त्याचं ऐकून मराठ्यांना आरक्षण दिले जाणार नसेल, तर गाठ मराठ्यांसोबत आहे. एकदा आरक्षण मिळू द्या, मग मी त्याच्याकडे बघणार आहे. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा देखील आरक्षण मिळाल्यावर हिशोब करणार आहे. गोळीबार, लाठीमार होऊन देखील आंदोलक अजून मागे हटलेले नाहीत. 307 सारखे गंभीर गुन्हे आपल्यावर दाखल केले. पहिल्यांदा एवढं निर्दयी आणि निष्ठुर सरकार पाहिलं. सरकार किती लोकांना अडकवणार आहे. लक्षात ठेवा 6 कोटी मराठा आहे, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ यांचे ऐकून अन्याय करायचा असेल, तर सरकारला मराठा समाज सोडणार नाही. छगन भुजबळमध्ये किती दम आहे, हे आपण पाहून घेऊ. मराठा आरक्षणाचे पुरावे असतानाही आरक्षण दिले नाही. मराठा समाजाने इतरांसाठी छातीचा कोट केला, मात्र तेच लोक आता मराठा समाजाला विरोध करत आहेत. आत्तापर्यंत 39 लाख मराठा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे. आरक्षण नसल्याने मराठयांच्या नोकरीचा टक्का कमी झाला. त्यांना माहित नाही आमच्या हातात दंडूके आहेत. काही लोक जातीवाद निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणासाठी मी खूप अपमान सहन केला, पण समाजाने संयम ठेवावा. तर, मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, असेही जरांगे म्हणाले.
भाषण सुरु असतानाच रुग्णवाहिका आली...
बीड जिल्ह्यातील धारूर येथे मनोज जरांगे यांची सभा होत आहे. या सभेसाठी परिसरातील मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे सभेचं ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचे भाषण सुरु असतानाच अचानक त्याठिकाणी एक रुग्णवाहिका आली. त्यामुळे उपस्थित आंदोलकांनी तत्काळ या रुग्णवाहिकेला जागा करून दिली. त्यामुळे कुठलाही अडथळा न येता ही रुग्णवाहिका तेथून गेली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Manoj Jarange : तब्येत खालावली, रात्रभर उपचार, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; तरीही जरांगे सभेवर ठाम