बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु असतानाच, 30 व 31 ऑक्टोबर रोजी बीडमधील (Beed) आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या होत्या. याचवेळी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या राहत्या घरात आणि राष्ट्रवादी भवनात देखील आग लावण्यात आली होती. मात्र, यावरून संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. बीड जळत असताना पोलीस हातावर हात देवून बसले, पोलिसांकडून साधे सायरन सुद्धा वाजवले जात नव्हते असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी  ते बोलत होते. 


दरम्यान यावेळी बोलतांना संदीप क्षीरसागर म्हणाले की, ज्यांनी बीडमध्ये जाळपोळ केली त्यांना अद्याप अटक का झाली नाही. दुपारी दोन वाजल्यापासून शहर जळत असताना पोलीस हातावर हात देवून बसले होते. यावेळी पोलिसांनी साधे सायरन सुद्धा वाजवले नाही. आंदोलन करणारे वेगळे आणि तोडफोड जाळपोळ करणारे वेगळे होते. जाती जातीत भांडणे लावण्यासाठी हे षडयंत्र होते. त्यामुळे, मी लवकर बोललो नाही. जाळपोळीच्या घटनेनंतर बीड शहरातील व्यापारी अद्यापही घाबरलेले आहेत. आशी परस्थिती राहिली तर आम्हाला बीडमध्ये राहता येणार नाही असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे, पोलिस तब्बल सात तास हातावर  हात ठेवून का बसले होते याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही क्षीरसागर म्हणाले. 


आगामी अधिवेशनामध्ये देखील यावर आवाज उठवणार 


तर, ज्या लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली ते मराठा आंदोलक नव्हते. जे काही समाजकंटक होते, त्यांचा सूत्रधार पोलिसांनी शोधून काढला पाहिजे. बीडमध्ये घडलेल्या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. मात्र, तरी देखील पोलीस मुख्य सूत्रधारावर का कारवाई करत नाहीत. तर, आगामी अधिवेशनामध्ये देखील यावर आवाज उठवणार असल्याचे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. 


जळालेल्या कार्यालयात साजरी केली दिवाळी...


बीडमध्ये करण्यात आलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी भवनात घुसून जमावाने मोठी तोडफोड केली होती. तसेच, राष्ट्रवादी भवनाच्या इमारतीला आग लावण्यात आली होती. यामध्ये इमारतीमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे, यंदाच्या  दिवाळीत पाडवा सण याच राष्ट्रवादी भवनमध्ये आपल्या कुटुंबासह साजरा करण्याची घोषणा रोहित पवार आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली होती. त्यानुसार, जळालेल्या या कार्यालयात यंदाची दिवाळी पवार आणि क्षीरसागर कुटुंबांनी साजरी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : ऐन दिवाळीत पोलिसांनी केली धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणात 181 जणांची दिवाळी जेलमध्ये