बीड : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी परळीमध्ये संवाद बैठक घेतली. याच बैठकीचे रूपांतर एका सभेमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले. तर, याच सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, "बीडसह (Beed) राज्यात मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि गृहमंत्र्यांच यावर एकमत आहे का? म्हणून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत, त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही त्यांच्याशी भांडणार आहोत. तसेच, गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून माझ्या घरावर नोटीसा लावल्या जात आहेत असे देखील जरांगे पाटील म्हणाले. 


मराठ्यांच्या मताची ताकद काय असते हे 24 तारखेच्या बैठकीत ठरवणार आहोत. मराठा समाजाच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. पण ते चुकीच्या माणसाला भेटले असून, मी समाजाला दैवत मानतो, त्यामुळे मराठा समाजाने एकजूट दाखवावी. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नये असं म्हणत 24 तारखेला आंतरवाली या ठिकाणी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे जरांगे म्हणाले. या बैठकीत मराठा समाजाच्या मताची ताकद काय असते यावर निर्णय होणार आहे. तर नऊशे एकरावर सभा कुठे घ्यायची याची देखील घोषणा या बैठकीत करण्यात येणार असल्याचे जरांगे म्हणाले. 


बैठकीच्या परवानगीवरून सरकारवर निशाणा...


मनोज जरांगे पाटील यांच्या परळीच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शेवटी आयोजकांनी न्यायालयात धाव घेतली आणि बैठकीला परवानगी मिळाली. यावरून देखील जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारला मराठा समाजाबद्दल द्वेष आहे. याच कारणाने बैठकांना परवानगी नाकारली जाते. सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांना कायदा लागू होत नाही का? राजकीय नेते सभा घेतात, त्यांना परवानगी मिळते मग आम्ही सामाजिक बैठका घेऊ शकत नाहीत का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. सरकार जरी आमच्या सोबत अन्यायाने वागत असलं तरी न्यायदेवता योग्य न्याय करेल असं जरांगे म्हणाले.


24 तारखेला मराठा डाव टाकतील...


मुंबई आंदोलनात सगेसोयरे कायद्याबाबत सरकारने आश्वासन दिल्याने जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता हा कायदा लागू केला जात नसल्याने जरांगे यांनी यावरून देखील सरकारवर टीका केली आहे. सरकारने खोटे बोलून डाव टाकला असून आता 24 तारखेला मराठा डाव टाकतील. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर सरकारने सगे सोयरे आधी सूचना जारी करणार म्हणून कॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. आचारसंहितेचा कारण पुढे करून सरकारने डाव जरी टाकला असला तरी 24 तारखेला जी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या :


Jalna Loksabha : मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीवर परिणाम होणार? रावसाहेब दानवेंच्या विजयात मराठा फॅक्टर महत्त्वाचा