Manoj Jarange Sabha : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी आज बीड (Beed) शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेतून मनोज जरांगे 24 डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे. त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक (Maratha Protestors) आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेतून मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


मनोज जरांगे शुक्रवारी रात्रीचं बीड शहराजवळ असलेल्या मांजरसुंबा येथे मुक्कामी पोहचले होते. त्यानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयावरून मनोज जरांगे हे बीड शहरासाठी निघतील. दहा वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली ही अण्णाभाऊ साठे चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर सभास्थळी पोहचेल. दरम्यान, अडीच ते तीन किलोमीटरची ही रॅली साडेतीन ते चार तासानंतर अंदाजे दोन वाजता सभास्थळी पोहचेल.


मनोज जरांगे यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी


दरम्यान, सभेपूर्वी आयोजित करण्यात आलेली रॅली संपून मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीड शहरातील पाटील मैदानावर सभास्थळी पोहचतील. जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यामुळे यासाठी परवानगी मिळावी म्हणून सभेच्या आयोजकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. तर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला होता. यावर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या पुष्पवृष्टीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची सभा सुरू होण्यापूर्वी सभास्थळी हेलिकॉप्टरमधून पुष्पृष्टी केली जाणार आहे.


जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 400 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई...


काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरून बीड जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी जमावाने अनेक राजकीय नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. त्यातच आजच्या सभेच्या निमित्ताने बीड शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी बीड पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर 400 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात यापूर्वी जाळपोळ आणि दगडफेकीचे गुन्हे दाखल असलेल्या लोकांचा देखील समावेश आहे. तसेच, रेकॉर्डवरील उपद्रवी लोकांवर देखील पोलीस लक्ष ठेवून आहे.


हे ही वाचा :


Gokhale Institute : गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल मराठा आरक्षण मिळवून देणार का