बीड : फडणवीस साहेबांनी फक्त गेसोयऱ्यांची मागणी मान्य करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, मी त्यापुढे राजकारणावर एक शब्दही बोलणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. फडणवीसांनी आपल्याविरोधात मराठा आमदार उभे केलेत, त्यांनी जर आरक्षण दिलं नाही तर त्यांना राजकारणात लोळवल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. बीडमध्ये झालेल्या घोंगडी बैठकीमध्ये मनोज जरांगे यांनी हे वक्तव्य केलं. 


मराठ्यांनी तुमचं काय वाईट केलं? 


देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, तुम्हाला गरिबांची मुलं मोठी व्हावेत असं का वाटत नाही? या सरकारमधील मंत्र्यांना गरिबांची पोरं मोठी होऊ नयेत असं का वाटतं? तुम्हाला फक्त तुमचा पक्ष आणि नेते मोठे करायचे आहेत. देवेंद्र फडणवीस, मराठ्याच्या मुलांनी तुमचं काय वाकडं केलं? मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले. कुठे केसेस करत आहे, कुठे मराठ्यांचे आमदार विरोधात उभे करता. फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटत नाही. जर तुम्ही आरक्षण दिले नाही तर आम्हाला सत्ता काबीज करावी लागणार.  मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी वाटेल ते करेन. 


देवेंद्र फडणवीस साहेब, मी राजकारणाचा एक शब्द काढत नाही, तुम्ही फक्त आरक्षण द्या. मी पुन्हा यावर बोलणार नाही. तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग मी राजकीय बोलणार असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 


माझ्यावर बोलण्यासाठी बैल बदलले जात आहेत


तुम्ही ज्या पक्षात काम करत आहे त्या पक्षाचे नेते आम्हाला का आरक्षण देत नाहीत? असा सवाल आता भाजपमधल्या पुढाऱ्यांना त्यांची लेकरं विचारतील असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, तुमच्या लेकरांवरील अन्याय कायम डोळ्यासमोर ठेवा. माझ्या विरोधामध्ये भरपूरजण उभे केले आहेत. आठवड्यालाच आमदार बदलतात. बैल बदलले जात आहेत. 


गावागावात घोंगडी बैठक होणार


गावागावात घोंगडी बैठकीचे नियोजन करा असं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, हे तीन महिने मराठ्यांचे अस्मितेचे आहेत भविष्याचे आहेत. लढाई माणूस केवळ बेसावध राहिल्यामुळे हरतो. उद्यापासून गावागावात 20 पोरांची टीम तयार करा. ज्या गावात अशा टीम तयार होतील त्याच गावात घोंगडी बैठका होतील. गरीब मराठा सगळा बाजूला गेलाय. श्रीमंत मराठ्याला गरीब मराठा जमत नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी आठ दिवस आधी आपण बैठक घेवू आणि मग ठरवू की आपण निवडणूक लढवायची का नाही. 


लाठीचार्ज केलेल्या अधिकाऱ्याला बढती दिली


जातीयवादी आधिकऱ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये लेकरा-बायांना मारले. ज्यांनी मराठ्यांना मारले त्यांना तुम्ही बढती दिली हे समाज विसरणार नाही. समुद्रसारखी काँग्रेस गेली, तुम्ही गर्वात राहू नका. पोलीस लाठीचार्ज करतात, हल्ले करतात. हा जीवघेणा हल्ला फडणवीसांनी जाणून बुजून करवून आणला असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.


मराठ्यांचा तोल सुटला तर हे आमदार चटणीला पण उरणार नाही. मी मराठ्यांच्या पोरांना शांत राहायला सांगतोय. फडणवीससाहेब, एकदा का मराठा समाज रस्त्यावर उतरला की तुम्हाला जमिनीवर पण पाय ठेवू देणार नाहीत असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


मराठ्यांना हारू देऊ नका


भाजपचे नेते तर म्हणतात मी लई खुनशी आहे. मग भाजपचे नेते रात्रीच येतात आणि गोधडीमधून उठवतात आणि हे फडणवीस साहेबांना माहितीच नाही असं जरांगे म्हणाले. भाजपमधील इतकी लोक बाहेर आहेत की एकेदिवशी सगळेच आपल्याकडे येतील. तुम्ही एकदा पाडून ताकत दाखवली. मराठ्यांना हारू देवू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.


ही बातमी वाचा: