बीड : आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं असं मनोज जरांगे म्हणाले.
बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.
Manoj Jarange Beed Speech On Maratha Reservation : काय म्हणाले मनोज जरांगे?
गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावतंय. ते संकट आता मोडून काढायचं आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं नुकसान झालं. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं. यापुढे आपण विचारांनी चालायचं. बीडमधील मराठा समाज आता एक झाला आहे, गर्व वाटेल असं काम करतोय. आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत. आता असंच मुंबईला जायचं.
मुंडेंचे मारेकऱ्यांना धरा
बीडच्या सभेमध्ये पोलिसांनी डीजे वाजवू दिला नाही. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, आपल्याला बीडच्या सभेत डीजे वाजवू दिला नाही, ठीक आहे. पण आमचा डीजे वाजवू दिला नाही, यापुढे बीडमध्ये कुणाचाही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. देवेंद्र फडणवीसांनी जर पोलिसांना आदेश दिले असतील आणि पोलीस जर चुकीचे काम करत असतील तर तसं करू नका. एवढी विनंती करुनही जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला काही करायचं असेल तर त्या महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना शोधा.
आमदार तुमचा म्हणून पोरांची फी माफ होणार नाही
मनोज जरांगे म्हणाले की, तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावं. कुणा राजकीय नेत्याचं ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल.