बीड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वी आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर पेटवून देण्यात आले असतानाच, आता बीडच्या माजलगाव नगर परिषदेमध्ये जाळपोळ करण्यात आली आहे. आरक्षणाची मागणी करत आलेल्या जमावाने माजलगाव नगर परिषदेमध्ये घुसत जाळपोळ सुरू केली. त्यामुळे नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये मोठी आग लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. 


बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर जाळपोळ करणारं जमाव थेट माजलगाव नगर परिषदेत पोहोचलं. या जमावाने नगर परिषदेत जाळपोळ केली आहे. त्यामुळे सध्या घटनास्थळी मोठी आग पाहायला मिळत आहे. तसेच परिसरात धुराचे लोट दिसत आहे. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या माजलगाव परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


ठिकठिकाणी रास्ता रोको... 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता उग्ररूप घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी-बीड त्यासोबतच धुळे-सोलापूर आणि त्यानंतर आता कल्याण विशाखापटनम महामार्गावर सुद्धा आंदोलन करत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण विशाखापटनम महामार्गावर तालखेड फाटा येथे मराठा समाज आंदोलन करत असून, रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


उभ्या मोटरसायकल पेटवल्या..


बीड जिल्ह्यात सकाळपासून सुरु असलेलं हिसंक आंदोलन अजूनही सुरूच आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.  माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश साळुंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकडून हिंसक आंदोलन केली जात आहेत. बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत जमावाने दगडफेक केल्यानंतर बीड शहरातील सगळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. यावेळी सुभाष रोडवर लावलेल्या दोन मोटरसायकल हे जमावांने पेटवून दिले आहेत. त्यामुळे शहरात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत असून, पोलिसांचे बंदोबस्त वाढवण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात गदारोळ; मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर घोषणाबाजी करणारे ताब्यात