Beed Crime: मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर समोर आलेल्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नव्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत 9 जणांची चौकशी केली असून आज आणखी दोघांची चौकशी होणार आहे.  दरम्यान,  31 जुलै रोजी महादेव मुंडे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत . (Mahadev Munde Case)

आतापर्यंत 8 तपास अधिकारी बदलले

20 ऑक्टोबर 2023 रोजी  परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचापरळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 8 तपास अधिकारी बदलण्यात आले. मुंडे कुटुंबाच्या आक्रमक पवित्र्यानंतर खून प्रकरणात तपासाला वेग आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपींच्या शोधात आहे. आत्तापर्यंत झालेल्या चौकशीतून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. 

बाळा बांगर यांनी केलेले दावे

काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत . महादेव मुंडे यांचा मर्डर हा वाल्मीक कराडच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनीच केल्याचा आरोप त्यांनी केला .हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं .एवढंच नाही तर वाल्मीक कराड याने मारणाऱ्यांना शाबासकी व गाड्याही गिफ्ट दिल्या . वाल्मिक कराडनं माझ्यासमोर तिघांना मारला असून मी साक्षीदार आहे असा दावा बाळा बांगर यांनी केला होता .

ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्महत्येचा प्रयत्न

बाळा बांगर हे या घटनेतील साक्षीदार आहेत त्यांनी केलेल्या दाव्यानुसार पोलीस तपास का करत नाहीत? असा सवाल महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता .बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या भेटीनंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्याच कार्यालयाबाहेर विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचललं होतं .20 ऑक्टोबर 2023 ते आज 30 जुलै 2025 पर्यंत महादेव मुंडे प्रकरणात एकाही आरोपीला अटक झालेली नाही .पोलिसांकडून वारंवार दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आहे .दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत .आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे महत्त्वाचे ठरणार आहे .

हेही वाचा:

Beed: महादेव मुंडे यांचे कुटुंबीय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, 21 महिन्यांपासून न्यायाची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसमोर उद्या मांडणार कैफियत