मुंबई : परळीच्या महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणात कुणीही असो, त्याला सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला. महादेव मुडें हत्याप्रकरणी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
परळीत दोन वर्षांपूर्वी, 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कराड गँगचे इतरही सदस्य यामध्ये असून पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.
कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर गेल्या 21 महिन्यांचा वृत्तांत मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. हे सर्व ऐकूण मुख्यमंत्री भावुक झाले. या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं."
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, "महादेव मुंडे हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यांनी तात्काळ बीडच्या एसपींना फोन लावला आणि या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले."
वाल्मिक कराडमुळे पोलिस तपास थांबला
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, "पोलिस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरुन फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला अशी माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरुन वाल्मिक कराडने केला आहे. यामध्ये अजून कुणी आहे का याचा सीडीआर काढण्याची विनंती आम्ही केली. या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावे आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहेत. यावर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, सगळ्यांना अटक करणार असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला."
महादेव मुंडे हत्येचा तपास एसआयटी करणार
ज्ञानेश्वरी मुडेंनी केलेल्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या 21 महिन्यांपासून महादेव मुंडे प्रकरणी आरोपी खुलेआम फिरत आहेत. त्यांना अटक करण्याची जबाबदारी आता एसआयटीवर असेल.
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
- 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीच्या तहसील परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.
- 24 जानेवारी 2025 रोजी धस यांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन.
- 25 जानेवारी रोजी अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षकांकडे तपास वर्ग.
- 11 फेब्रुवारी रोजी तपास एसआयटीमार्फत करण्याची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेची मागणी.
- 13 फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक संतोष साबळेंच्या पथकाची नेमणूक.
- 18 फेब्रुवारी रोजी सुप्रिया सुळे आणि आव्हाडांकडून कुटुंबीयांची भेट.
- 3 जुलै रोजी विजयसिंह बांगर यांचा जबाब नोंदवला.
- 16 जुलै रोजी तपास पुढे जात नसल्यानं पत्नीकडून दोनदा आत्महत्येचा प्रयत्न.
- 21 जुलै रोजी वाल्मिक कराड, भावड्या कराड, गोट्या गितेचा पीसीआर घेण्याची पत्नीची मागणी.
- 29 जुलै रोजी महादेव मुंडे कुटुंबीयांना मुख्यमंत्री कार्यालयातून भेटीसाठी फोन.
- 31 जुलै रोजी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
ही बातमी वाचा: