बीड : महाराष्ट्रात दसरा मेळाव्याची (Dasara Melava 2024) परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भगवानगडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) दसरा मेळावा घायचे. त्यांच्या निधनानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दसरा मेळावा घेत आहेत. यंदा बीडच्या नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यावरून कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली आहे.  


धनंजय मुंडे म्हणाले मी, ताई मी आज एवढा भारून गेलोय की, बारा वर्षाच्या तपानंतर दसऱ्याचा मेळावा आलाय. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळीवेगळी परंपरा आहे. ही परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे समजली पाहिजे. भगवानगडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन केला जायचा. या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आणि त्यानंतर ही पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवत आहेत. मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला आणि त्यांनीही भोगला. हा प्रारब्ध आता संपला आहे, असे त्यांनी म्हटले. 


आपल्या सगळ्यांचे जीवन संघर्षातून गेले 


ते पुढे म्हणाले की, कुणी म्हणत असेल की एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून एकत्र आले. माझ्या दृष्टीने निवडणूक राजकारण याच्या पलीकडे हा विचाराचा भक्तीचा आणि शक्तीचा, स्वर्गीय मुंडे साहेबांचा आणि त्यांचा वारसा चालवत असलेल्या पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा आहे. आपल्या सगळ्यांचे जीवन संघर्षातून गेले आहे. आजही आपण संघर्ष करतोय. त्या संघर्षाची सुरुवात मुंडे साहेबांनी चालू केली. तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता. मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजाताई मुंडेंनी सुरू केला तो त्यांच्या स्वतःसाठी नव्हता. आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करतोय. आम्ही स्वतःसाठी संघर्ष केली नाही तर जनतेसाठी संघर्ष केला आहे आणि हीच शिकवण आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांचे संघर्षाच्या काळात तुमच्या संघर्षाची लढाई मुंडे साहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर पंकजाताईंनी घेतली. इथून पुढच्या संघर्षाच्या काळात आपल्या सर्वांना एक होऊन त्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहायचे आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


जरांगे पाटलांच्या मेळाव्यावर धनंजय मुंडेची टीका


काही जणांनी मला विचारलं, म्हटलं मला आनंद आहे. ज्याला दसरा माहिती त्याला प्रभू श्रीराम पण माहिती पाहिजे. पुढचं मी बोलणार नाही तुम्ही समजून घ्या.  अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात.  अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात ही आणला नाही.  ज्याला जो वारसा दिलाय त्याने तो चालवायला पाहिजे. मला, पंकजाला जेवढा आनंद आहे त्या पेक्षा जास्त आनंद तुमच्या डोळ्यात दिसतोय. नवीन मेळावा सुरु करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली आहे. 


आणखी वाचा 


Manoj Jarange Patil : आमचा धक्का लागतो म्हणता, मग 17 जातींचा समावेश करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही का? मनोज जरांगे पाटलांची विचारणा