बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या, तसेच खंडणी प्रकरणामध्ये वाल्मीक कराडसह त्याची टोळी पोलिस कोठडीत आहे. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निवटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने मुंडेंना देखील सहआरोपी करा अशी मागणी विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे सोबत गुन्हेगारी करायचे आसा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे, त्याचबरोबर याबद्दलचा एक पुरावा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बीडमधील 2007 मधील एका प्रकरणामध्ये केलेल्या एफआयआरमध्ये दोघांचीही नाव एकत्र असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण, या प्रकरणातून पुढे धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं असल्याची चर्चा आहे. हा FIR मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत बोलताना अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडबाबतच्या सर्व जुन्या केस रीओपन करा असं म्हटल आहे.


काय म्हणाल्या अंजली दमानिया?


वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे अगोदर पासून एकत्र काम करायचे याचा हा एफआयआर सगळ्यात मोठा पुरावा आहे. धनंजय मुंडे स्वतःच टोळीत असतानाही करायचे, या स्टेटमेंटवरून तसे दिसते. श्रीरंग फड जात वंजारी याचा अर्थ हा माणूस आत्ताच्या घटकेला संतोष देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे किंवा कराड, वंजारी विरुद्ध मराठा हे तसं नाही. ही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, त्यांना जात-पात नसते. त्यांच्याच जातीच्या लोकांना त्यांनी कसं मारलं हे त्याच चार्जशीट वरून दिसते. धनंजय मुंडे आणि त्यांची टोळी 25 लोकांची टोळी त्या गाडीला थांबवतात. गाडीवर रॉकेल टाकत बाहेर येऊ देत नाहीत, बाहेर पडला तर गोळ्या झाडीन, हे स्वतः धनंजय मुंडे बोलतात आणि कराड दरवाजा बंद करतो. रॉकेल टाकून गाडी पेटवली जाते, याच्यांवर 360 चा गुन्हा दाखल झाला. मात्र, महान पोलिसांनी काय चौकशी केली हे माहिती नाही. आता हीच केस डीस्पोज झाली. त्याची माहिती घेऊन पुन्हा ओपन करण्याची मागणी करणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुंडे आणि कराडवरील सर्व डिस्पोंस केलेल्या केस रीओपन करा अशी न्यायालयीन समिती समोर मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.


सोशल मिडियावर एक मेसेज व्हायरल


बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर एक जुना 18 एप्रिल 2007 चा FIR व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या FIR सोबत एक मॅसेज देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा पुरावा असल्याचं बोललं जात आहे. पुढे 2007 मध्ये किशोर फड याला जिवे मारण्याच्या आणि गाडी जाळल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड हे दोघे आरोपी आहेत, असंही या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.


धनंजय मुंडे यांचे नाव या एफआयआरमध्ये कसं आलं असा सवाल उपस्थितीत झाला आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा हा पुरावा असल्याचं अंजली दमानियांनी म्हटलं आहे. असा मेसेज व्हायरल होत असल्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत गुन्हे करायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढे धनंजय मुंडे यांचं नाव या प्रकरणातून वगळण्यात आलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे.


नेमकं प्रकरण काय?


18 एप्रिल 2007 रोजी परळीतील स्टेडियममधील सांस्कृतिक सभागृहात भंगार लिलावाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका स्कॉर्पिओ गाडीला पेटवून दिल्याची तक्रार किशोर श्रीरंग फड यांनी पोलिसांत दाखल केली होती. या प्रकरणी धनंजय मुंडे, रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासह 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, किशोर फड हे त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीसह भंगार लिलावाच्या ठिकाणी पोहोचले असता धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदारांनी गाडी अडवली. यावेळी धनंजय मुंडे यांनी फड यांना टेंडरमध्ये सहभागी होऊ नकोस, असा इशारा दिला. मात्र, फड यांनी लोकशाहीत सर्वांना संधी असल्याचे सांगत बोली लावण्याचा हट्ट धरला. यानंतर वाद वाढला आणि संतप्त झालेल्या धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी स्कॉर्पिओवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.


या घटनेत किशोर फड आणि त्यांचा ड्रायव्हर बालाजी घुले गाडीत अडकले होते. तक्रारीनुसार, धनंजय मुंडे आणि रामेश्वर मुंडे यांनी फड यांच्यावर रिव्हॉल्व्हर ताणून त्यांना धमकी दिली. दरम्यान, वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी गाडीचा दरवाजा दाबून धरला आणि अन्य जमावाने दगडफेक सुरू केली. कसाबसा सुटून बाहेर पडताना फड यांचा उजवा हात आणि शर्ट जळून गेला, तर संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या गाडीची अंदाजे किंमत 8 लाख रुपये होती. घटनेनंतर अभिजित पंढरीनाथ मुंडे, संजय प्रल्हादराव बचाटे आणि सायस भोदाले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अखेर आरोपी तेथून पळून गेले. परळी पोलिसांनी धनंजय मुंडे, रामेश्वर मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या 25 साथीदारांविरोधात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला होता.