बीड: बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई लवकरच बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी सतीश भोसले (Satish Bhosale) याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालया अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल. तर दुसरीकडे बीड पोलिसांची (Beed Police) दोन पथके खोक्या भाईला शोधण्यासाठी दिवस-रात्र एकत्र करत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या हाती न लागलेल्या खोक्या भाईने (Khokya Bhai beed) सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीला सविस्तर मुलाखत दिली होती. त्यामुळे बीड पोलिसांची कार्यक्षमता आणि विश्वासर्हता याविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


दरम्यान, सतीश भोसले याच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज सादर करताना त्याचे वकील शशिकांत सावंत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला आहे. त्यांनी म्हटले की, शिरुर पोलीस ठाण्यात ढाकणे यांनी जो गुन्हा दाखल केला आहे, तो  एफआयआर बघा, त्यामध्ये सतीश भोसले मुख्य आरोपी नाही. या एफआयआरमध्ये चौथ्या क्रमाकांचा आरोपी आहे. ढाकणे कुटुंबावर अॅट्रॉसिटो आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की, घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्यावतीने सतीश भोसलेच्या नातेवाईकांना अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली होती. तेव्हा बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये काहीतरी तडजोड झाली होती आणि एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा नाही, असे ठरले. मात्र, राजकीय दबावामुळे नंतर दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर दोन दिवसांपूर्वी ढाकणे यांच्याविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश भोसले यांनी ढाकणेंना मारहाण केली असती तर ते आपल्या बापाला गाडीतून खाली उतरवून ढाकणेंना दवाखान्यात घेऊन का गेले असते? मारणारे हात कधी वाचवत नाही, असे सतीश भोसलेच्या वकिलांनी सांगितले.


खोक्या भाई स्वत:च्या मर्जीने सरेंडर करण्याची शक्यता


संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड याच्यानंतर बीड पोलिसांना पुन्हा एकदा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात अपयश आले आहे. बीड पोलिसांनी सतीश भोसले याला शोधण्यासाठी दोन पथके तैनात केली आहेत. मात्र, त्यांना खोक्या भाईचा ठावठिकाणा मिळालेला नाही. तर दुसरीकडे खोक्या भाई प्रसारमाध्यमांना राजरोसपणे सविस्तर मुलाखती देत आहे. पण बीड पोलिसांना अडून खोक्या भाईला गाठता आलेले नाही. सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीडच्या शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चार दिवसांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके धावपळ करत आहेत. परंतु, हा खोक्या देखील वाल्मीक कराडप्रमाणेच सरेंडर होणार असल्याची माहिती आता सुत्रांनी दिली आहे. तो आता पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याच्या चौकशीतून काय समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



आणखी वाचा


लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर