CM Eknath Shinde :  जे अडीच वर्ष केवळ घरात बसले त्यांना 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम काय समजणार. या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्यांचा अपमान करण्यासारखं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले. बदनामी करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 


बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आता पर्यंत झालेल्या शासन आपल्या दरी मध्ये सगळ्यात यशस्वी हा कार्यक्रम झाला. ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आतापर्यंत वीस कार्यक्रम झाले. 1 कोटी 84 लाख लोकांनी 'शासन आपल्या दारी' योजनेचा लाभ घेतला.


विरोधकांवर हल्लाबोल 


सरकारचा बोगस कार्यक्रम आहे असे काहीजण म्हणतात. अनेक लोक लाभ घेऊन गेले.  जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचे महत्व असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. अडीच वर्ष घरात राहून बोगसगीरी केली त्यांनी असं म्हणणं हा लोकांचा अपमान आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या कर्यक्रमाला येत आहेत.  ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश जागा मिळाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. 


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकाल बघून मोदींची लाट दिसली. लाट संपली म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. 


मुख्यमंत्री तुम्ही खरच राज्याचे एकनाथ : धनंजय मुंडे 


मुख्यमंत्री तुम्ही खरच राज्याचे एकनाथ असल्याचे प्रशंसोद्गार राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी काढले. सगळे एकत्रित मिळून या जिल्ह्याचा विकास करून दाखवू असे आवाहनही त्यांनी केले. 283 कोटी रुपये वैद्यनाथ देवस्थान साठी दिले असल्याचे मुंडे यांनी म्हटले. कोकणात तुम्ही कोकाकोलाचा प्रकल्प दिला. आता, आम्हाला 'फँटा' तरी द्या असे म्हणत धनंजय मुंडे यांनी परळी-बीडमध्ये उद्योगाची मागणी केली. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या :