Vishwajit Jagtap Accident : माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप (Mohan Jgtap) यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप (Accident ) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 


माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप आणि त्याचा मित्र हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून गावी माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटल्याने आयसर (टेम्पो) ला धडक बसली. यात विश्वजित यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासह असलेला मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावला असल्याने सुदैवाने वाचला. ही घटना  रात्री बाराच्या दरम्यान घडली. विश्वजीत जगताप यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.  या अपघातामुळे राजकीय क्षेत्रासह बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


नेत्यांच्या अपघातात वाढ


मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या अपघातात वाढ झाली आहे. सुदैवाने अपघातात नेत्यांचा जीव वाचला आहे. आतापर्यंत  बच्चू कडू, योगेश कदम, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे  या सगळ्या नेत्यांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने सगळ्या नेत्यांची प्रकृती नीट आहे. मात्र नेत्यांच्या होत असणाऱ्या अपघातांमुळे अपघात की घातपात असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 


निम्मे अपघात रात्रीच...


 अनेक अपघात रात्रीच होत असल्याचं चित्र आहे. माण-खटावचे आमदार  जयकुमार गोरे यांची गाडी नदीच्या पुलावरून 50 फूट खाली कोसळली होती. या अपघातात ते थोडक्यात बचावले होते. आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातांमध्ये निम्मे अपघात रात्रीच्यावेळी झाले आहेत. त्यामुळे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याचा मोठा सल्ला सगळ्यांना दिला आहे.  मागील वर्षी विनायक मेटे यांचं रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झालं होतं. त्यांचाही अपघात रात्रीच्या वेळीच झाला होता. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी रात्रीचा प्रवास टाळा किंंवा रात्री गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. 


संबंधित बातमी-


Nashik Sinnar Accident : नाशिक सिन्नर अपघातप्रकरणात मोठं अपडेट; फरार ट्रक चालकास औरंगाबादमधून घेतलं ताब्यात