बीड : नगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं बीडमधील राजकारणात (Beed Politics) उलथापालथ होत असल्याचं दिसून येतंय. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar NCP) मोठा धक्का बसला आहे. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे बंधू योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी अजित पवार यांची साथ सोडली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. योगेश क्षीरसागर आता भाजपच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.
राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणं होती, आता आता मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे असं योगेश क्षीरसागर म्हणाले. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं.
Beed Nagarpalika Election : कमळ चिन्हावर निवडणूक लढणार
सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे योगेश क्षीरसागर हे आता भाजपाच्या चिन्हावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत. यापूर्वी योगेश क्षीरसागर यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची बीड नगरपालिकेवर गेली कित्येक वर्षे निर्विवाद सत्ता राहिलेली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करतोय. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहोत. बीड नगरपरिषदेचे जागा महिलेसाठी राखीव आहे. त्यानुसार कमळावर आम्ही निवडणूक लढू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एक युनिट म्हणून काम करू."
Vijaysingh Pandit : बीडची सूत्रं विजयसिंह पंडित यांच्याकडे
बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देताना योगेश क्षीरसागर यांनी पक्षांतर्गत आपली नाराजी बोलून दाखवली. मी माझ्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले. मला विनाकारण विरोध केला गेला. पक्षाचे पदाधिकारी नेमताना मला कुठेही विश्वासात घेण्यात आले नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी देखील बोललो अशी खंत योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवली.
अजित पवारांनी बीड नगर परिषदेची सूत्रं ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिल्याने योगेश क्षीरसागर नाराज झाले. बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करणं कायम बीडकरांनी हाणून पाडले. हा प्रयोग सुद्धा बीडकर हाणून पाडतील, आपला स्वाभिमान जागा ठेवतील असा विश्वास योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
ही बातमी वाचा: