बीड : बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. आज भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यानंतर, नवनीत कॉवत यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना बीडमधील शस्त्र परवाने, सोशल मीडियावर दहशत माजवण्याचे प्रकार आणि वाल्मिक कराड यांना असलेलं पोलीस संरक्षण याबाबतच्या प्रश्नांवर भाष्य केलं.
नवनीत कॉवत म्हणाले, जेवढे शस्त्र परवाने आहेत, त्या सगळ्या परवान्यांचं अवलोकन सुरु आहे, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याबाबत कायद्याच्या हिशोबानं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. कायद्यानुसार शस्त्र परवान्यांची गरज आहे की नाही याचं विश्लेषण सुरु आहे. ज्या लोकांना गरज नाही त्यांचे शस्त्र परवाने रद्द होणार आहेत, असंही बीडच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पुढं म्हणाले की, शस्त्र परवाने जितके आहेत त्याचं अवलोकन सुरु आहे. शस्त्र परवाना देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असतो. आम्ही प्रत्येक फाईलचं विश्लेषण करणार आहोत. ज्यांना शस्त्रांची गरज नाही त्यांचे परवाने रद्द केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बीड पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतील. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू, कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असंही कॉवत यांनी म्हटलं.
दहशत माजवणाऱ्यांना इशारा
नवनीत कॉवत म्हणाले की युवकांना सांगितलं आहे की दहशत पसरवणारे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु नये,जे व्हिडीओ व्हायरल करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. आम्ही बीड पोलीसमध्ये तीन चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे.
अंजली दमानिया यांनी जी माहिती दिली होती. त्याची सखोल चौकशी केली. चौकशीत निष्पन्न झालं की दारु पिऊन त्या माणसानं मेसेज केला होता.
सामाजिक तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका. तशा प्रकारची पोस्ट पोलिसांकडे आल्यास गुन्हा दाखल करु असंही नवनीत कॉवत म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. बीड पोलीस त्यांना सहकार्य करत आहेत, असंही त्यांननी म्हटलं. वाल्मिक कराड यांना जे अंगरक्षक देण्यात आले आहेत, याबाबत विचारलं असता याची माहिती घेऊन बोलू असं नवनीत कॉवत यांनी म्हटलं.
इतर बातम्या :
तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? आव्हाडांचा थेट फडणवीसांना सवाल