बीड : सध्या राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभं ठाकल्याचं चित्र दिसतंय. असाच एक प्रसंग बीडच्या आष्टी तालुक्यातील सीना धरणाच्या जलपूजना वेळी घडला. या धरणाचे सकाळी राष्ट्रवादीकडून तर संध्याकाळी भाजपकडून जलपूजन करण्यात आलं.
गेल्या तीन वर्षापासून समाधानकारक पाऊस असल्याने सिना धरण ओव्हरफ्लो झालं आहे. मागच्या काही दिवसापासून सीना धरणाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई रंगली होती. या लढाईमध्ये आणखी आज भर पडली ती म्हणजे सीना नदीच्या पाण्याचं जलपूजन. सकाळी आमदार रोहित पवार आणि आमदार बाळासाहेब आजबे यांनी जलपूजन केलं तर संध्याकाळी त्याच धरणावर भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे आणि आमदार सुरेश धस यांनी जलपूजन केलं.
जलपूजनाचा कार्यक्रमावेळी आ. रोहित पवार म्हणाले, "राजकारण करत असताना प्रथम जनतेच्या हिताच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. आमचे सहकारी आ. आजबे यांच्या समावेत आपण सीना आणि मेहकरी धरणातील हक्काच्या पाण्यासाठी वेळोवेळी सरकारकडे पाठपुरावा करून सलग तीन वर्ष हे धरण भरून घेतले. त्यामुळे या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यापुढेही जामखेड कर्जत आणि आष्टी मतदार संघासाठी पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे आ. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले."
आ. सुरेश धस यांची रोहित पवार यांच्यावर टीका
सिना निमगांव गांगर्डा मध्यम प्रकल्प म्हणजे काय, त्यासाठी काय करावे लागले, त्याचा इतिहास काय आहे हे न पाहता केलेल्या कामाचे बटन दाबले म्हणजे ते काम आम्हीच केले असे म्हणणाऱ्यांचे तसेच पाच पाच ठिकाणी जलपूजन चाललंय त्यांचं वाईट वाटतंय असं म्हणत आ. सुरेश धस यांनी नाव न घेता आ. रोहित पवार यांच्यावर टिका केली. ते सिना निमगांव गांगर्डा जलपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा.आ.राम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.धस पुढे बोलताना म्हणाले, "मागच्या मी आमदार असताना 97 टक्के काम पूर्णत्वास नेलं होते. त्यानंतर तीन टक्के काम प्रा.आ.राम शिंदे यांनी पूर्ण केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी औरंगाबाद येथे मराठवाडाच्या हक्काच्या पाण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यावेळेच जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट घेऊन सीना मेहकरी प्रकल्प तसेच रखडलेला भोसेखिंड मार्ग यासाठी पहिल्या वर्षी 12 कोटी मंजूर केले. तेथून पुढे ही योजना सुरु झाली आणि माझ्या काळात 97 टक्के या योजनेचे काम झाले होते. तरीही आम्ही कधीही नारळ फोडायचा कार्यक्रम केला नाही. कुठंच पाण्याचे जलपूजन केले नाही.कधीच दिंडोरा पिटवयाचे काम कधीच केले नाही. विरोधक मात्र आत्ता पाच-पाच ठिकाणी जलपूजन आणि नारळ फोडण्याचे काम करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं काही मीच सगळं केलं."
यावेळी बोलताना प्रा.आ.राम शिंदे म्हणाले, "सीना प्रकल्प कुकडीच्या पाण्याने भरला आहे. हे धरण वरदान आहे विरोधक म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहेत. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी मागील काळात आम्ही काम केले आहे. मागच्या तीन वर्षात एक तरी काम झालं का? शेवटी अपेक्षा ही आपल्याच माणसाकडून केली जाते."