बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या बीडमध्ये (Beed) दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत. कधी मारहाण, कधी दहशत पसरवण्याचा प्रकार, कधी रिल्स, तर कधी बँकेच्या फसवणुकीमुळे कर्जबाजारीमुळे आत्महत्यासारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यातच, आता बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाब पोलिसांना (Police) निवेदनही देण्यात आलं आहे. संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नेमका प्रकार काय?
शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड शहरात हे दोघे जण खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. सदर प्रकरणानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
महिला आयोगाकडून दखल, क्लासेसची इमारत सील
बीड जिल्ह्यात खासगी क्लासमधील अल्पवयीन मुलीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आली आहेत. राज्य महिला आयोगाने पोलिसांना सदर क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, या क्लासमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन अजून अशा तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत असून तिचे समुपदेशन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा
रुमाल काढणे जीवावर बेतले, कोल्हापूरचा युवक आंबोली घाटात कोसळला; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू